कल्याणात गॅस गळतीमुळे घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्सजवळील कोळीवली गावात काल रात्री घरगूती गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाला. तर या घटनेमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

कोळीवली गावात शिसोदिया आरकड नावाची 7 मजली इमारतीतील 3 ऱ्या मजल्यावर राहणाऱ्या बैनिवाल कुटुंबियांच्या घरी हा प्रकार घडला. रात्री 11 च्या सुमारास कृष्णा बैनीवाल हे एकटेच असताना अचानक गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागली. याबाबत स्थानिकांनी तातडीने केडीएमसी फायर ब्रिगेडला माहिती कळवताच अवघ्या काही मिनिटांत फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीच्या भीषणतेमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाता येत नव्हते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आणि जीवाची बाजी लावून स्फोट झालेला आणि त्याच्या शेजारी असणारा आणखी एक असे दोन्ही गॅस सिलेंडर बाहेर काढले. त्यानंतरही दोन्ही सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरूच होती. त्यापैकी एका गॅस सिलेंडरमध्ये चमचा अडकल्याचे अग्निशमन दलाला आढळून आले. हा चमचा बाहेर काढताच काही प्रमाणात गळती कमी झाली. तरी धोका कायम असल्याने आणि गॅस एजन्सीचे कोणतेही कर्मचारी घटनास्थळी न पोचल्याने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही गॅस सिलेंडर आधारवाडी अग्निशमन केंद्रांवर आणले. त्यामुळे स्थानिकांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान हा स्फोट इतका भीषण होता की घराच्या भिंतींचे, स्लायडिंगचे, खिडकीच्या चौकटीचे आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जखमी झालेल्या व्यक्तीची पत्नी आणि मुलगा सोसायटीत खाली असल्याने त्या दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही.

केडीएमसी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी, केंद्रप्रमुख विनायक लोखंडे, लिडिंग फायरमन सुनील मोरे, फायरमन ठाकूर, पाटील, ईसामे, किरणदास आदींनी सुमारे पाऊण तास झुंज देत ही आग आटोक्यात आणली आणि पुढचा मोठा अनर्थ टळला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web