नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली हत्या, पोलिसांनी शिताफीने चौकडीला ठोकल्या बेड्या

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – काही दिवसांपूर्वी खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू नव्हे तर खून झाल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांनी उघड केला आहे. विशेष म्हणजे साक्षीदार किंवा इतर कोणतेही धागेदोरे नसतानाही मानपाडा पोलिसांनी केवळ एका कॉलच्या सहाय्याने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

11 सप्टेंबरला दुपारी 12 च्या सुमारास खंबाळपाडा परिसरात एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वाहतूक पोलीस बी.एस.होरे याना आढळून आले होते. कृष्णमोहन तिवारी वय वर्षे 47 असे या व्यक्तीचे नाव असून रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यु झाला. मात्र त्याच्याकडे असणाऱ्या आधारकार्डवरून त्याचे नाव आणि घराचा मिळवत मानपाडा पोलिसांनी घरी चौकशी केली. मात्र पोलिसांना त्यातही विशेष असे काहीच आढळून आले नाही. परंतू त्यांच्या मुलीने सकाळी 10.30 च्या सुमारास एक फोन आला आणि त्यानंतर वडील घराबाहेर पडले अशी माहिती पोलिसांना दिली. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत कॉल रेकॉर्डची माहिती मिळवली आणि आणखी खोलात तपास करत पोलिसांनी या सर्व खुनाच्या हत्येचा उलगडा केला.
कृष्णकुमार हा मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि लॉकडाऊनमूळे कतारमधील नोकरी गमावल्याने तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी दिव्यातील एका प्लेसमेंट सेंटरकडे त्याने आपली माहिती दिली होती. या प्लेसमेंट सेंटरमधील माहितीच्या आधारे आरोपी रिहान शेखने त्याला मोबाईलवर संपर्क केला आणि नोकरीसाठी त्याला कल्याण पूर्वेच्या कचोरे भागात भेटायला बोलावले. त्यानंतर रिहानने साथीदार सागर पोन्नालाच्या सहाय्याने आणि सुमित सोनावणे याच्या रिक्षेत बसवत लूटमार करत त्याचा खून केल्याची माहिती कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली. रिहानने अशाप्रकारे आणखीही काही जणांना लुटले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले.
डोंबिवलीचे एसीपी जे.डी. मोरे,मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, पोलीस हवालदार काटकर, कदम, चौधरी, पोलीस नाईक यादव, घुगे, सोनवणे, भोसले, डी. एस.गडगे, किनरे, पवार, पाटील, कांदळकर, आर.जी.खिलारे, कोळी, मंझा यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web