मुंबई/प्रतिनिधी – खासदार राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीचे मतदान व मतमोजणी एकाच दिवशी 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्राधिकार पत्रांसाठी 23 सप्टेंबरपर्यंत शिफारस पत्रे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे सादर करावीत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या निवडणूकीच्या मतदान, मतमोजणीचे वृत्तसंकलन आणि छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रितिनिधींनी पोटनिवडणूकीच्या प्राधिकारपत्रांसाठी आपल नावे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र दोन प्रतींसह महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे 23 सप्टेंबर 2021 पर्यंत पाठवावीत.
प्रत्येक शिफारस पत्रासोबत पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्र असणे आवश्यक आहे. एकाच व्यक्तीला दोन्ही केंद्रात प्रवेश हवा असल्यास तीन प्रतींसह सादर करावीत. छायाचित्रांच्या छायांकित प्रती स्विकारल्या जाणार नाहीत. प्राधिकारपत्रे द्यावयाच्या व्यक्तींची संख्या मर्यादित असावी अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.