कल्याण/संघर्ष गांगुर्डे – काही दिवसापूर्वी कल्याणचे तहसीलदार यांना एक लाख वीस हजारांची लाच घेताना अटक झाली.त्यानंतर थोड्याच दिवसात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात अभियंता व प्लबर यांना ४ हजाराची लाच घेताना अटक झाली होती. त्या आधी सरकारी विभागातील एकट्या कल्याण शहरात एका मागोमाग अनेक सरकारी बाबूंना लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आलेली आहे. जणू काही कल्याणच्या सरकारी विभागात लाच घेण्याची स्पर्धा लागली आहे. या सरकारी बाबूंना लाच घेण्याचा भस्म्या जडला आहे का? असा सवाल सामान्य नागरिकांनच्या मनात येत आहे. लाखो रुपये पगार घेणाऱ्या या सरकारी बाबूंची खाबुगिरी केव्हा संपणार देव जाने, त्यातच कल्याण शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील शाखा अभियंत्याने एक लाखाची लाच घेण्याचा पराक्रम केला आहे.
प्रकल्पात बाधित होणाऱ्या बांधकामांचे मुल्यांकन देण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंत्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. अविनाश भानुशाली अस या शाखा अभियंत्याचं नाव असून सहा महिन्यानी हा अभियंता निवृत्त होणार होता.आज दुपारच्या सुमारास कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयात सापळा रचत त्याला ताब्यात घेण्यात आले .धक्कादायक बाब म्हणजे भानुशाली याने यापूर्वी 4 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील तपास करत आहे
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात कल्याण नजीकच्या रायते गावातून जात असल्याने तक्रादाराचे बांधकाम यात बाधित होत आहे. सदर बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी भानुशाली याने 9 सप्टेंबर रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी 4 लाख घेतले त्यानंतर 1 लाख रकमेच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार केली होती तक्रारीनुसार ठाणे एसीबी युनिटने आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सापळा रचून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना भानुशाली यांना रंगेहाथ अटक केली .याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.