कल्याण/प्रतिनिधी – नवीन कल्याण म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्याच्या पुढील गोदरेज हिल बारावे याठिकाणी सुरु असलेली केडीएमटीची बससेवा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. हि बससेवा बंद असल्याने येथील नागरिकांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत असून रिक्षाला जास्त भाडे देऊन रोज ये जा करावी लागत आहे. यासाठी येथील बससेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी येथील जेष्ठनागरिकांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल बारावे परिसरात सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असून २ हजार लोकं नोकरी निमित्त रोज स्टेशनला ये जा करतात. येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने याठिकाणी बससेवा सुरु केली होती. हि बससेवा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे येथील नागरिकांना खाजगी बस अथवा रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. खाजगी बस स्टेशनपर्यंत २० रुपये तर रिक्षाला प्रती व्यक्ती ४० रुपये अथवा डायरेक्ट रिक्षा केल्यास १०० रुपये देखील मोजावे लागत आहेत. हेच जर पालिकेची बस सुरु असल्यास नागरिक १० रुपयांत स्टेशनला जातात, तर जेष्ठ नागरिक अवघ्या ५ रुपयांत स्टेशनला जातात. यामुळे केडीएमटीची बससेवा सुरु नसल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
याबाबत येथील जेष्ठ नागरिक वारंवार पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून संबधित विभागाचे उपायुक्त परिवहन व्यवस्थापकांकडे बोट दाखवतात, तर परिवहन व्यवस्थापक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात. प्रत्येक जण आपली जवाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील जेष्ठ नागरिक आर. बी. शेगोकार यांनी सांगितले.दरम्यान याबाबत परिवहन व्यवस्थापक दिपक सावंत यांना विचारले असता कोरोना काळात लॉकडाऊनमुळे परिवहनचे बहुतांश मार्ग हे बंद होते. आता हळूहळू सर्व मार्ग पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.