प्रत्येक शेतकऱ्याला २ ऑक्टोबरपासून मिळणार डिजिटल सातबारा

शिर्डी/प्रतिनिधी–  राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह 2 ऑक्टोबर 2021 पासून डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने सुरू केलेला ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प हा देशासाठी आदर्शवत आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या युगाची सुरुवात ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी या गावाने ‘ई-पीक पाहणी’ योजनेत शंभर टक्के नोंदणी केल्याबद्दल राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी व ऑनलाईन डिजिटल सातबारा वितरणाचा कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नामदार थोरात यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष ‘ई-पीक पाहणी’ केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाईन डिजिटल सातबाराचे वितरणही करण्यात आले

मंत्री थोरात म्हणाले की, ‘ई-पीकपाहणी’ योजना शेतकऱ्यांच्या जीवनात नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांची स्वतः नोंद करता येणार आहे. यामुळे राज्यात कोणत्या पिकांचे किती लागवड झाली आहे. भविष्यात कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आहे. याची अद्यावत माहिती सुद्धा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना खरी तर देशासाठी आदर्शवत ठरणारे आहे. मागील दीड वर्षापासून महसूल मंत्रिपदाच्या काळात आपण नव्याने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. यातून ऑनलाईन सातबारा, ई-फेरफार शेतकऱ्यांना अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने मिळत आहेत. सातबारावरील अनावश्‍यक नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. 2ऑक्टोबर 2021 गांधी जयंती पासून सर्व शेतकऱ्यांना सातबारा घरपोच मिळणार आहे. संगमनेर तालुक्यात मागील वर्षी मॉडेल म्हणून या ‘ई-पीक पाहणी’ अभियानाची सुरुवात केली. आज संपूर्ण राज्यामध्ये ‘ई-पीक पाहणी’ लागू करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली असून उर्वरित गावांमधील शेतकऱ्यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. असे आवाहन ही मंत्री  थोरात यांनी केले यावेळी केले.

प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला आधुनिक व डिजिटल चेहरा दिला आहे. मागील मंत्रिपदाच्या  काळात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवून त्यांनी या विभागाला आधुनिकता व गतिमानता दिली तसेच आता नव्याने ई-पीक पाहणी, डिजिटल सातबारा हे अत्यंत आदर्श उपक्रम देशाला दिले आहे. 15 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या नव्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शेती उत्पादनाबाबत माहितीची स्वायत्तता मिळणार आहे. लवकरच संपूर्ण तालुका ‘ई-पीक पाहणी’ नोंद मध्ये शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील सर्व कर्मचारी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.यावेळी अध्यक्षस्थानी आर. बी .रहाणे होते तर व्यासपीठावर महानंदा व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सौ सुनंदाताई जोर्वेकर, सौ मिराताई शेटे ,साहेबराव गडाख, अजय फटांगरे, जि. प. सदस्य मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, संगमनेर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे,  तहसीलदार अमोल निकम,नायब तहसीलदार उमाकांत कडनर यांसह महसूल विभागाचे सर्कल, तलाठी व विविध कर्मचारी उपस्थित होते .त्याच बरोबर कैलास सरोदे, सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव राहणे, शांताराम कढणे, साहेबराव सरोदे, मुरलीधर सरोदे, विजय राहणे, बबन सरोदे आदींसह विविध शेतकरी उपस्थित होते .

सात गावांमध्ये 100% ‘ई-पीक पाहणी’ ची नोंद

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ई पीक पाहणी अभियानात संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठा सहभाग घेतला असून 174 गावांपैकी आनंदवाडी, रणखांब, मा़ंची ,कोळवाडे, विद्यानगर, खांडगाव ,खांडगेदरा या सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली आहे तर उर्वरित गावांमधील 80 टक्के पर्यंत पोहचली आहे..

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web