कल्याण/प्रतिनिधी– कोरोना काळात विकासकामाचा वेग राखण्यात सातत्य ठेवणाऱ्या पालिका अधिकार्याच्या कामाची मुख्यमंत्री स्तुती करत असतानाच दुसरीकडे महापालिकेचा कनिष्ठ अभियंता लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात घडली आहे.पाण्याच्या नवीन जोडणीकरिता 4 हजारांची लाच घेताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सुनील नारायण वाळंज (49) आणि त्याचा साथीदार प्लंबर रविंद्र हरिश्चंद्र डायरे (39) या दोघांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली विभागीय कार्यालयात करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
या संदर्भात दीपक शिंपी (48) यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार शिंपी यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून एका नविन घराकरिता पिण्याच्या पाण्याची नवीन लाईनसाठी अर्ज केला होता. मात्र सदर लाईन मंजूर करून त्याची वर्कऑर्डर काढून देण्याकरीता कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज याने शिंपी यांच्याकडे 5 हजारांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ही रक्कम 4 हजारांवर निश्चित करण्यात आली. तथापी त्याचदरम्यान शिंपी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 जुलै रोजी पडताळणी केली असता या तक्रारीत तथ्य आढळून आले. विशेष म्हणजे कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज याने मागणी केलेली 4 हजारांची रक्कम त्याचा साथीदार प्लंबर रविंद्र डायरे याच्याकडे देण्यास सांगितल्याचेही तपासात निष्पन्न झाले. पोनि विलास मते यांच्या नेतृत्वाखाली हवा. मोरे, भावसार, राजपूत, त्रिभुवन या पथकाने सापळा रचून ही रक्कम तक्रारदार दीपक शिंपी यांच्याकडून स्वीकारताना प्लंबर रविंद्र डायरे याला रामनगर परिसरात रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज यालाही अटक करण्यात आली.