ठाणे जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

ठाणे/प्रतिनिधी – संस्कारक्षम युवा पिढी घडवितानाच समाजाला पुढे आणण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडावी. त्यातून एक चांगले समाजमन घडवावे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.दरम्यान, काळानुरूप बदलत जाणारी शिक्षण व्यवस्था अंगिकारून विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले.येथील मो. ह. विद्यालयाच्या सभागृहात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते.चांगल्या शिक्षकांमुळे आयुष्याला वळण मिळते*यावेळी पालकमंत्री शिंदे म्हणाले, चांगले काम करणाऱ्याच्या पाठीवर शाबासकी देण्याचं काम पुरस्काराच्या माध्यमातून केलं जातं. शिक्षकांचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व असून आई-वडिलांच्या बरोबरीने शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर संस्कार केले जातात. चांगले शिक्षक मिळाले तर आयुष्याला वळण मिळते. महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी ते राज्याचा नगरविकास मंत्री इथपर्यंतचा प्रवास शिक्षकांमुळे झाल्याचे सांगतानाच त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नसल्याचे मंत्री शिंदे यांनी यावेळी आर्वजून सांगितले आजही ग्रामीण भागात एक शिक्षकी शाळा आहेत आणि त्याद्वारे ध्येय म्हणून शिक्षकांकडून मुलांना ज्ञानार्जनाचं काम सुरू असल्याचे सांगतानाच जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविण्यात येत आहेत. ज्या प्रलंबित आहेत त्यावर तातडीने मार्ग काढला जाईल, असेही पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. शिक्षण हे क्रांती घडविण्याचं साधन असून चांगले समाजमन घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोना काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यावेळी म्हणाले, पुस्तकी ज्ञानाच्या जोडीला व्यवहारज्ञान शिकविणे काळाची गरज आहे. काळानुरूप बदलत जाणारी शिक्षण व्यवस्था अंगिकारून विद्यार्थी घडविण्याचे काम करावे. विद्यार्थ्यांला केवळ परिक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी केले.शिक्षकांनी आपले योगदान देऊन विद्यार्थी घडविताना त्या गावाचा विकास आणि पर्यायाने तालुक्याच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन करून केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाले की, शिक्षकांमधला आदर्शपणा विद्यार्थ्यांमध्ये येऊ द्या. त्यांच प्रतिबिंब विद्यार्थ्यांमध्ये दिसले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असते ती शिक्षकांनी ओळखून देशाची जडणघडण करणारा विद्यार्थी घडवावा असे आवाहन केद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी केले. देशातील प्रत्येक तालुक्यातील एक गाव घेऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प राबविण्यात येणार असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

बालमनाला आकार देऊन त्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी चांगली कामगिरी केल्याचे ठाणे जि.प. अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी यावेळी सांगितले. गुरूपौर्णिमेच्या दिनी जि.प.च्या ५३५ शिक्षकांना निवड श्रेणीची भेट दिल्याचे सांगतानाच शिक्षकांचे ज्या समस्या आहेत त्यावर मार्ग काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाच काम झालं असून आता ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी, जि.प.चे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी यावेळी केली.

कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षण देण्याचं काम अविरतपणे सुरू असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दांगड यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोरोना काळात शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जि. प.च्या शिक्षणा विभागाने राबविलेला स्वाध्याय उपक्रम यशस्वी ठरल्याचे डॉ. दांगड यांनी सांगितले. शिक्षणासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम, कोरोना विषयक जनजागृती या कामांत शिक्षकांनी मोलांचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्यासाठी बॅंक आणि संगणकीय प्रणाली विकसीत करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जि.प.चे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी आभार मानले.

२०२०-२१ पुरस्कार प्राप्त शिक्षक असे– लक्ष्मण बुधाजी कारवे, जि.प.शाळा, चिराडपाडा, भिवंडी, राणु जनार्दन बनसोडे, जि.प.शाळा चिकण्याची वाडी, अंबरनाथ, माधुरी वसंत सुरोशे, जि.प.शाळा कोंढरी, कल्याण, दिपक दत्तात्रय पाटोळे, जि.प.शाळा फांगळोशी, मुरबाड, रविंद्र बाबाजी भोईर, जि.प.शाळा कुंडणपाडा, शहापूर, *

२०२०-२१ पुरस्कार प्राप्त शिक्षक असे– ज्ञानेश्वर बळीराम काठे, प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा मालोडी, भिवंडी, कालप्पा रामचंद्र होटकर, प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा काकोळे, अंबरनाथ,अनंत काळूराम केदार, पदवीधर शिक्षक, जि.प.शाळा म्हसकळ, कल्याण, एकनाथ महादू देसले, प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा देवगांव, मुरबाड, चंद्रकांत नामदेव पाटील, प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा, शेंद्रुण, शहापूर. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार विजेते चंदाराणी कुसे आणि डॉ. गंगाराम ठमके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.कोरोना काळात चांगले काम करणारे कोविड योद्धे म्हणून जयवंत भंडारी, प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा ब्राम्हणगाव, भिवंडी, सत्यवान शिरसाट, प्राथमिक शिक्षक, जि.प.शाळा खुटारवाडी, मुरबाड, अलंकार वारघडे, प्राथमिक शिक्षक, जि.प.शाळा, खरशेत, मुरबाड, श्री. योगेंद्र बांगर, जि. प. केंद्र शाळा, मुरबाड, अजय पाटील, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा, राहनाळ, भिवंडी, सौ. विद्या शिर्के, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा, तळेखल, मुरबाड, प्रमोद पाटोळे, प्राथमिक शिक्षक, जि.प.शाळा, वाऱ्याचापाडा, शहापूर, नटराज मोरे, प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा, गोळवली, कल्याण, श्री. पंकज चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जि. प. उपाध्यक्ष तथा अर्थ व शिक्षण समिती सभापती सुभाष पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती श्रेया श्रीकांत गायकर, कृषी विभाग सभापती संजय निमसे, शिक्षण समिती सदस्य सुषमा लोणे, जि.प. सदस्य, अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.*

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web