असाही एक डोंबिवलीकर ज्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत १०० वेळा केले रक्तदान

डोंबिवली/प्रतिनिधी -सर्व श्रेष्ठदान म्हणजे रक्तदान मानले जाते. दिलेल्या रक्ताने प्राण वाचले जातात. त्यामुळेच अनेकजण रक्तदान करून समाजाची अशाही प्रकारे सेवा करत असतात. मात्र असा एक अवलिया आहे की ज्याने वयाच्या 58 वर्षांपर्यंत 100 वेळा रक्तदान करून शेकडो लोकांचे प्राण वाचविले आहेत. मुंबईतील माझगाव डॉकमध्ये छायाचित्रकार म्हणून नोकरी करणाऱ्या डोंबिवलीकर दत्तप्रसाद वसंतराव मंत्री या अवलियाने रक्तदानाची शंभरी पूर्ण केली आहे.
दत्तप्रसाद पूर्वी टिटवाळा येथे रहात असत. सद्या ते डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या कस्तुरी प्लाझा गृहसंकुलात राहतात. 1984 मध्ये तेथील एका सामाजिक संस्थेने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तेव्हा हेच दत्तप्रसाद 21 वर्षांचे होते. या रक्तदान शिबिरात प्रथमच त्यांनी रक्तदान केले. फक्त 7 ते 8 मिनीटात रक्तदान झाले. मात्र त्यामुळे किंचितही त्रास झाला नाही. हे रक्तदान आपण दर तीन महिन्यांनी करु शकतो हे दत्तप्रसाद यांना त्या शिबिरातच समजले. त्यानंतर माझगाव डॉकची नोकरी लागली. या कंपनीत सुध्दा रक्तदान शिबिराचे आयोजन होत असे. तेव्हा तेथे एकदा त्यांनी रक्तदान केले. या शिबीरातील डॉक्टरांनी सांगितले की, तुम्हाला जर तीन महिन्यांनी पुन्हा रक्तदान करावयाचे असल्यास तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन रक्तदान करू शकता. तेव्हापासून दत्तप्रसाद यांचा रक्तदानाचा सिलसिला चालू झाला.

बऱ्याचदा लक्षात राहायचे नाही आणि हॉस्पिटलमध्ये जायचा कंटाळा यायचा. त्यामुळे नियमित रक्तदान होत नसे. एकदा मुंबईतील सेन्ट जोर्जेस हॉस्पिटलमध्ये हेच दत्तप्रसाद रक्तदान करण्यास गेले. तेव्हा तेथील रक्तदान रूमच्या आधी असलेल्या एका रूममध्ये बरीच लहान मुले दिसली. नर्सला त्याबद्दल विचारल्यानंतर तिने या मुलांना thalassemia हा आजार आहे व हा आजार जन्मापासून असतो. या आजारांमध्ये शरिरात रक्त तयार होत नाही, म्हणून या मुलांना दर तीन महिन्यांनी बाहेरून रक्त द्यावे लागते. प्रत्येकवेळी या मुलांचे आई-वडील रक्त विकत घेऊ शकत नाही. त्यावेळी या मुलांना सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा उपयोग होतो. तेव्हा दत्तप्रसाद यांनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करायचे असा संकल्प सोडला. रक्तदान करुन कंपनीत गेल्यानंतर भिंतींवर टांगलेल्या कॅलेंडरवर पुढच्या रक्तदानाच्या तारखेवर खूण करून ठेवण्याचा जणू नियमच जडला. अशाप्रकारे दत्तप्रसाद हे नियमित रकतदाता झाले. त्यानंतर 25 वेळा रक्तदान झाले.25 वेळा रक्तदान झाल्यानंतर 50 वेळा रक्तदान करण्याची इच्छा होते. त्यानंतर 75 वेळा रक्तदान झाले व आज माझ्या रक्तदानाची शंभरी पूर्ण झाल्याचे दत्तप्रसाद अभिमानाने सांगतात.
नियमित रक्तदानाच्या फायद्याविषयी दत्तप्रसाद म्हणाले, या नियमीत रक्तदानाचा एक फायदा म्हणजे रक्ताच्या बऱ्याच चाचण्या झाल्यानंतर ते रुग्णाला देत असल्यामुळे रक्तदात्याला काही गंभीर आजार असल्यास ते लगेच समजते. या नियमीत रक्तदानासाठी माझा फेडरेशन ऑफ मुंबई ब्लड बयाकेतर्फे वेळोवेळी सत्कार सुध्दा झाला आहे. ठाण्यात Raktanand ही संस्था दरवर्षी 31 डिसेंबरला भव्य रक्तदानाचे शिबीर आयोजित करते. माझे 75 वेळा रक्तदान पूर्ण झाल्यावर या संस्थेतर्फे त्यावेळी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला होता. वयाच्या 65 वर्षांपर्यंत रक्तदान करता येते व तोपर्यंत रक्तदान करायचे असे मी ठरवले आहे. मी माझ्या निधनानंतर देहदानाचा सुद्धा फॉर्म एका संस्थेत भरला आहे. छायाचित्रकला, चित्रकला, पर्यटन व calligraphy असे आपले छंद आहेत. चित्रकलेसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि सौ. चार्ली चॅप्लिन यांनी प्रशस्तीपत्र पाठवले आहे. मुंबईतील द फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा आजिव सदस्य असून छायाचित्रकलेसाठी मला छोटी-मोठी पारितोषिके मिळाली आहेत. या संस्थेसाठी मी छायाचित्रण सहलीचे देखिल आयोजन करत असतो, असेही ते म्हणाले.

दत्तप्रसाद मंत्री यांनी आतापर्यंत मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये 20, केईएम हॉस्पिटलमध्ये 6, सेंट जोर्जेस हॉस्पिटलमध्ये 64, तर फेडरेशन ऑफ ब्लड बँकमध्ये 10 वेळा रक्तदान केले आहे. वार्धक्याकडे वाटचाल करणाऱ्या मात्र तरुणाईलाही लाजविणाऱ्या  रक्तकर्ण दत्तप्रसाद मंत्री यांनी रक्तदानाची शंभरी पूर्ण केली आहे. समाजातील सर्व स्तरातून दत्तप्रसाद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web