डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला अटकाव घालण्यासाठी गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी द्या जेणेकरून प्रभागा प्रभागातील नागरिकांचे लसीकरण होईल अशी मागणी शिवसेना युवासेनेचे अनमोल म्हात्रे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आरोग्य मंत्री,आणि केडीएमसी आयुक्त यांच्याकडे केली आहे.
गेल्यावर्षी पासून कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना, मंडळांना मनात असूनसुद्धा गणेशोत्सव एकत्रीत साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधही शिथिल झाले आहेत. साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी राज्य शासनाने देऊ केली आहे. सध्या गरज ही नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याची आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसींचा केंद्राकडून अपुरा पुरवठा केला जात असल्यामुळे आजही अनेक नागरिक लसीच्या पहिल्या डोस पासून वंचित आहेत.त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळास लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिल्यास डोंबिवलीच्या प्रभागातील नागरिकांनाही सोयीचे होऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. लसीकरणाचा वेग वाढवून आरोग्य सेवकांचा भारही कमी होईल. त्यासाठी लागणारा लस साठाही महापालिका प्रशासनास उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डोंबिवली पश्चिमेचे युवासेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांनी केली आहे.