दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

नवी दिल्ली/प्रतिनिधी – महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती आणि पुजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रदर्शन व विक्री  १० सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या २९ वर्षांपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात ४० गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो.अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांची वर्दळ सुरु झाली आहे. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजरचा अनिवार्य  वापर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची खरेदी होत आहे. गणेशमुर्तींच्या उंचीलाही मर्यादा असून येथे प्रदर्शन व विक्रीकरिता असलेल्या मूर्तीची कमाल उंची 3 फुट आहे. दिल्लीस्थित नंदा एस्कोर्टसह अन्य गणेश मंडळांनी  गणरायाच्या मोठ्या मुर्त्या राखीव करून ठेवल्या आहेत.

ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील 23 वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’एम्पोरियमध्ये येतात. एम्पोरियमच्या दालनात यंदा लहान मोठ्या आकाराच्या एकूण 800 गणेशमूर्ती आहेत. यासर्वच मुर्त्या इकोफ्रेंडली आहेत. 6 इंच ते 3 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध असून 500 रूपयांपासून ते 26 हजार रूपयांपर्यंत त्यांची किंमत आहे. महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात १० सप्टेंबर २०२१ पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web