पावणेतीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस कल्याण क्राईम ब्रँचने ठोकल्या बेड्या

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-शिळ मार्गावरील गोडाऊन फोडून त्यातील लॉकरमधील 8 लाख 43 रोकड लंपास केल्याच्या गुन्ह्यात गेल्या पावणेतीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी आकाश उर्फ बटल्या सिंग (21) याला जेरबंद करडण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटला यश आले आहे. कल्याण कोर्टाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याण शिळ मार्गावर सोनारपाडा येथे रिअल वाईन्सच्या शेजारी असलेले डी. एस. एजन्सीचे गोडाऊन 24 ते 26 नोव्हेंबर 2018 दरम्यान चोरट्यानी फोडले होते. गोडाऊनचा लोखंडी शटरचा पत्रा वाकवून तेथिल 8 लाख 43 हजार 900 रुपये रोख रक्कम असलेल्या लॉकरसह चोरटे पसार झाले होते.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जानेवारी 2019 मध्ये 6 जणांना यात अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख 45 हजाराचा माल हस्तगत करण्यात आला. मात्र तेव्हापासून यातील मुख्य फरार आरोपी आकाश उर्फ बटल्या सापडत नव्हता. सतत राहण्याचे ठिकाण बदलून गेले अडीच-पावणेतीन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा बटल्या क्राईम ब्रँचच्या हाती लागला. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि भूषण दायमा, फौजदार मोहन कळमकर, दत्ताराम भोसले, मिथून राठोड, अर्जुन पवार, राजेंद्र खिलारे, प्रकाश पाटील, सचिन साळवी, गोरक्ष शेकडे, मंगेश शिर्के, गुरूनाथ जरग या पथकाने बटल्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडून माहिती घेऊन त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. बदलापूरमध्येच त्याला सापळा लावून बुधवारी पहाटे ताब्यात घेतले. कल्याण न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आकाश उर्फ बटल्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात बदलापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी 3 असे 6 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web