कल्याण परिमंडलात ८ लाख ७९ वीज ग्राहकांकडे ३९१ कोटी रुपयांची थकबाकी,वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल ८ लाख ७९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी महावितरणला कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. परिमंडलातील ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे व अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

धनंजय औंढेकर हे नुकतेच कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी रुजू झाले आहेत. यापूर्वी ते मुख्य कार्यालयातील देयके व वसुली विभागात मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. कल्याण परिमंडलातील विजेची हानी कमी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी परिमंडलातील अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, मीटर रिडींग, वीजबिल वाटप व पायाभूत सुविधा उभारणाऱ्या एजन्सीज समवेत संवाद साधून आगामी कामांबाबत भूमिका मांडली. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत १ लाख ६७ हजार ३२३ ग्राहकांकडे ३८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड व ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण समाविष्ट असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनमधील २ लाख ४७ हजार ९९ ग्राहकांकडे १८३ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागाचा समावेश असलेल्या वसई मंडलात ३ लाख २६ हजार १३२ ग्राहकांकडे लाख १०३ कोटी ८२ लाख रुपयांची तर पालघर, डहाणू, बोईसर, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, सफाळे भाग समाविष्ट असलेल्या पालघर मंडलात १ लाख ३८ हजार ६९५ ग्राहकांकडे ६५ कोटी ३३ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. 

यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७१३ पथदीप जोडण्यांचे १२७ कोटी ७ लाख आणि पाणीपुरवठा योजनांच्या ९९० जोडण्यांचे २ कोटी ८६ लाख रुपयांच्या वीजबिल थकबाकीचा समावेश आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राधान्याने भरावेत व याची जबाबदारी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर असल्याचे परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे. त्यानुसार वीजबिलाचा भरणा न झाल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून होणाऱ्या गैरसोयीस संबंधित ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार आहे. 

महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता औंढेकर यांनी दिले आहेत. त्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीपोटी तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी व अशा ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळल्यास वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनीही थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरून विजेचा रीतसर वापर करावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web