कल्याण/संघर्ष गांगुर्डे – ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या ‘अस्वस्थ मनाचे अलक’ आणि ‘कौल’ या दोन कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत, अकोला हे होते. तर उद्घाटक म्हणून अंजली साळी या होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिकचे प्रकाशक तानाजी खोडे, दोन्ही कथासंग्रहाचे लेखक प्रभाकर पवार मुरबाड, ज्येष्ठ लेखक भिकू बारस्कर मुंबई, सेवानिवृत्त मेजर विवेक बोडस, सुधाकर पवार, अपर्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वेगळेपण ठरलेली बाब म्हणजे लेखकाने त्यांचे दोन्ही पुस्तकं त्यांच्या शिक्षिका असलेल्या अंजली साळी बाईंना अर्पण केली आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा खुद्द दस्तुर आपल्या आई-वडिलांच्या हस्ते केला. रितसर विचारपीठावरील मान्यवरांसमवेत दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजन करून अंजली साळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
भिकू बारस्कर यांनी ‘कौल’ कथासंग्रहाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना प्रभाकर पवार यांच्या कथा शैली, ग्रामीण विषय आणि घटनानुक्रमांची ह्या आगळ्यावेगळ्या लेखन शैलीवर भाष्य केले. पवार यांच्या कथा कशाप्रकारे समाजभान जोपासणाऱ्या आहेत ते स्पष्ट केले. त्यांची गर्भार कथा ही कशी प्रेमाचे धुमारे फुलविणारी आहे, ते स्पष्ट करून सांगितले. त्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक माननीय मुकुंद देशपांडे, यांनी प्रभाकर पवार कथाविषयक काही बाबींवर प्रकाश टाकताना मोलाचा संदेश दिला. नवीन साहित्यकृती निर्माण करताना , नवनवीन साहित्य प्रकार हाताळायला हवे. सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतनात्मक लेखनाचा प्रवास करावा अशा प्रकारचा संदेश दिला.
ज्ञानसिंधु प्रकाशनाचे प्रकाशक तानाजी खोडे नाशिक यांनी लेखक प्रभाकर पवार यांच्या पुस्तकाची निर्मिती करताना येणारे अनुभव कथन केले. कौलमधील कथांमध्ये असलेला जिवंतपणा वाचकासमोर वास्तव रूपाने उभा राहतो. यांची आत्मानुभूती कथा वाचल्याखेरीज येणार नाही. प्रभाकर पवार यांनी साकार केलेली ही साहित्यकृती साहित्यामध्ये निश्चितच वेगळा आयाम निर्माण करणारी आहे असे स्पष्ट मत मांडले.
उद्घघाटक अंजली साळी यांनी आपले प्रभाकर पवारविषयीचे गोड कडू अनुभव कथन केले. शिक्षकांच्या एखाद्या बोलण्याने विद्यार्थ्यावर होणारा परिणाम म्हणजे कौल कथासंग्रह अशी थोडक्यात व्याख्या केली आणि आपल्या अनुभवातून प्रभाकर पवार सर्वांसमोर उभे केले.