निसर्ग प्रेमींसाठी केडीएमसी आणि न्यास ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने ग्रीन रेस उपक्रमाचे आयोजन

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात असलेल्या अनमोल वृक्ष संपदेची ओळख महापालिका क्षेत्रातील वनस्पती प्रेमी आणि निसर्ग प्रेमींना होण्यासाठी तसेच या वृक्ष संपदेची नोंदणी करण्यासाठी आणि त्याच प्रमाणे निसर्गाने दिलेल्या या हरित संपत्तीबाबत निसर्ग प्रेमींमध्ये अधिकाधिक रुची वाढवण्यासाठी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व न्यास ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने, दिनांक 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान “कल्याण-डोंबिवली ग्रीन रेस” चे आयोजन करण्यात आले आहे.

 महापालिका क्षेत्रात भोपर,कोपर, खोणी, निळजे, रेतीबंदर खाडी, एन.आर.सी., बारावे परिसर आणि इतर विविध निसर्गरम्य ठिकाणी मुबलक प्रमाणात वनस्पती आणि पक्षी यांचे चांगले वैविध्य आहे. ही जैवविविधता जतन करण्यासाठी तसेच या निसर्ग संपत्तीबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी आणि माणूस व निसर्ग यांना जवळ आणण्यासाठी ग्रीन रेस सारख्या स्पर्धेचा बहुमोल उपयोग होणार आहे.

     या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 26 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करता येणार आहे. https://forms.gle/zHC2tuR5eKQ5dUQ87 या लिंकवर अर्ज उपलब्ध राहील.या ग्रीन रेस मध्ये महापालिका क्षेत्रातील कोणताही नागरीक कोणीही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी शिक्षण, पदवी, वय, व्यवसाय अशा कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. स्पर्धेतील सहभाग हा तीन ते पाच जणांच्या गटाने घ्यावयाचा आहे. सदर गटातील सहभागी व्‍यक्तींनी महापालिका परिसरातील वनस्पतींची पाहणी करुन त्याची नोंद एका लॉगबुकमध्ये करावयाची आहे.

      स्पर्धेतील विजेत्यांना महानगरपालिकेतर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गायत्री ओक – 9372117562 व संकेत माईनकर – 9029306865 यांचेशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी /नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.

या अनोख्या उपक्रमामुळे महापालिका परिसरातील वनस्पतींची गणना निसर्गप्रेमींच्या माध्यमातून होऊ शकणार आहे.तसेच सध्याच्या कोविड साथीच्या तणावपूर्ण वातावरणात या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी व्यक्तिंना विरंगुळा मिळून निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेता येणार आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web