कल्याण/प्रतिनिधी – केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या ‘जन आशीर्वाद यात्रेला’ कल्याणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेला सुरुवात झाली. ढोल ताशा पथक आणि आगरी कोळी समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत स्वागत केले.दुर्गाडी चौकापासून सुरू झालेली ही जन आशिर्वाद यात्रा लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे मुरबाड रोड येथून आंबिवली टिटवाळा आणि त्यानंतर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये त्याचा समारोप होणार आहे. कल्याणात ठीक ठिकाणी या जन आशिर्वाद यात्रेचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत केलेले पाहायला मिळाले.
मोदी सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्यासोबतच आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, कौशल्य विकास, पीक योजना, कृषि सिंचन योजना, पंतप्रधान युवा योजना आदी योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम या जन आशिर्वाद यात्रेतून केले जात आहे.