डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या पोटातून काढले अर्ध्या किलोपेक्षा जास्त केस

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण मध्ये एका 12 वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून 650 ग्रॅम केसांचा गोळा काढण्यात डॉक्टरांनी यश मिळवले आहे. दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर पोटात असलेल्या आतड्यांतून हा केसांचा गोळा काढण्यात आला. याविषयी कल्याण पूर्व येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. रोहित परयानी यांनी सांगितले की, मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय लागली होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असे म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सोडण्यास खूप प्रयत्न केले परंतु ती सवय सुटली नाही. गेल्या आठवड्या पासून तीच पोट दुखणे सुरू झाले होते, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिचे वजन फक्त 20 किलो होते. या वयात किमान मुलांचे वजन 40 ते 45 किलो हवे असते.सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस दिसुन आले व गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवण जात नव्हते.

पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब केला जातो परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती म्हणूनच ओपन सर्जरीचा मार्ग निवडला व हा केसाचा गोळा काढण्यात यश मिळाले. शस्त्रक्रियेनंतर मुलीला जेवताना पाहून तिच्या पालकांना खूप आनंद झाला. या केसाच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबीझोअर म्हणतात. या दुर्मिळ प्रकारात केस खाल्ल्यामुळे असे गोळे तयार होतात. या केसांमुळे पोटाला ईजा होऊन पूदेखील तयार होतो. जसजसा या गोळ्याचा आकार वाढायला लागतो, तसतशी पोटदुखी सुरु होते. अनेक वेळा योग्य निदान झाले नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web