उबेर चालकाची हत्या करून कार चोरनाऱ्या आरोपीना बेड्या,कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – उबेर कार चालकाची हत्या करत कार चोरून उत्तर प्रदेश मध्ये पळवून नेत कारची विक्री करणाच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीचा कल्याण महात्मा फुले पोलिसांनी पर्दाफाश केलाय . कार मध्ये लावण्यात आलेल्या फास्टटॅग ,टोल नाक्यावरील सीसीटीव्ही मुळे हत्या व कार चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कार चालकाची हत्या करून त्याचा  हातपाय बांधून कसारा घाटात फेकून देण्यात आलेला मृतदेह देखील पोलिसांनी ताब्यात घेत तो कुटुंबाच्या हवाली केला आहे.

कल्याण मधून कार चोरून ती उत्तरप्रदेश नेऊन विकण्याच्या बहाण्याने भदोई येथून राहुलकुमार गौतम, धर्मेद्र्कुमार उर्फ वकील गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम असे पाच जण 3  ऑगस्ट रोजी कल्याणात आले. कल्याण स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण ते धुळे जाण्यासाठी उबेर कंपनीची कार बुक केली. कंपनीकडून अमृत गावडे या 35 वर्षीय कार चालकाला हे भाडे देण्यात आले. दिघा नवी मुबई येथे राहणारा अमृतने कल्याणच्या शिवाजी चौकातून या पाच आरोपींना गाडीत बसवून गाडी धुळ्याच्या दिशेने वळवली. मात्र तयारीनिशी आलेल्या आरोपींनी रस्ता सुनसान होताच अमृतच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली यानंतर त्याचा मृतदेह दोरीने बांधून तो कसारा घाटात फेकून देत गाडी घेऊन उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेले .मात्र कार मालकाने या गाडीला फास्टटॅग ऑन केलेला असल्यामुळे गाडीने टोल नाका क्रॉस करताच मालकाच्या खात्यातून टोल नाक्याचा चार्ज कापला जात  असल्यामुळे मालकाला गाडी उत्तर प्रदेश मध्ये पोहचल्याचे  लक्षात आले. दरम्यान चालकाचा कोणताही संपर्क होत नसल्याने मालक प्रमोद कुमार गुप्ता याने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत गाडीसह चालक हरविल्याची तक्रार दाखल केली होती. यात त्याने गाडी उत्तर प्रदेशपर्यत पोचल्याची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने तपास करत अखेर त्या खुन्याच्या मुसक्या आवळल्या.

महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने टोल नाल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून त्याचा ठाव ठिकाणा शोधला. यानंतर उत्तर प्रदेश मधील भदोई गावातून आरोपी राहुलकुमार गौतम, धर्मेंद्रकुमार गौतम,  अमन गौतम या तीन आरोपीसह चोरलेली कार आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार, चालकाचा मोबाईल, आधारकार्ड, पनकार्ड, मास्टरकार्ड, आर सीबुक, रेल्वेची पावती जप्त करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन आरोपीचा शोध उत्तर प्रदेश पोलिसाच्या मदतीने सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.  दरम्यान गरेज चालक अमन गौतम याने चोरीची गाडी विकण्याची तयारी केली होती मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web