शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलडाणा/प्रतिनिधी – अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणांनी आज चिखलीचा आसमंत निनादला. तालुका क्रीडा संकुल मैदानावर जमलेल्या हजारो नागरिकांनी शहीद जवान कैलास पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.भारतीय सैन्यात युनिट 10 महार रेजिमेंटमध्ये द्रास सेक्टर भागात भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे शिपाई पदावर कैलास भरत पवार कार्यरत होते. मात्र 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्ट वरून लिंक सोबत परत येत असताना अचानक मध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येवून ते खाली पडले. त्यांना जबर मार लागल्यामुळे ते गतप्राण होवून शहीद झाले. त्यांचे पार्थिव शरीर आज 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथून राहते घर गजानन नगर, चिखली येथे पोहोचले. त्यानंतर शहीद कैलास पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून तालुका क्रीडा संकुल मैदानापर्यंत काढण्यात आली. तालुका क्रीडा संकुल मैदानावर शहीद जवान कैलास पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद जवान कैलास पवार यांच्या पार्थिवाला बंदुकीच्या तीन फैरी झाडून भारतीय लष्कर, महाराष्ट्र पोलीस दलाच्या चमूकडुन मानवंदना देण्यात आली.  यावेळी साश्रु नयनांनी उपस्थित नागरिकांनी शहीद कैलास पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.  शहीद कैलास पवार हे महार रेजिमेंट येथे 2 ऑगस्ट 2020 रोजी भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे.

यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, माजी आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्ष प्रियाताई बोंद्रे, खासदार प्रतापराव जाधव यांचे प्रतिनिधी ऋषी जाधव,  जि.प महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, वस्त्रोद्योग महामंडाळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प सदस्य जयश्रीताई शेळके आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी शहीद जवान कैलास पवार यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहली

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web