अलिबाग/प्रतिनिधी – महाड परिसरातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे महाड – कळंबानि – पेढांबे या अतिउच्च दाबाच्या वाहिनीचे लोकेशन नं.09 आणि 10 चे मनोरे पडून 220KV महाड उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे महाड परिसरातील वीज प्रवाह बंद होऊन मोबाईल नेटवर्क सुद्धा बंद झाले होते. हा वीज पुरवठा तात्काळ सुरु होण्याच्या दृष्टीने महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती पाहणी करून मनोरे उभारण्याची व्यवस्था केली. परंतु पूर परिस्थिती, सतत पडणारा पाऊस आणि खंडित मोबाईल नेटवर्क यामुळे पुढील कामासाठी लागणारे साहित्य पुरवण्यासाठी सुद्धा परिस्थिती खूप कठीण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा महापारेषण च्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने सतत 9 दिवस अथक आणि अविरत परिश्रम करून हे दोन मनोरे पुन्हा उभारून 220KV महाड उपकेंद्राचा वीजपुरवठा दि.01 ऑगस्ट रोजी सुरळीतपणे कार्यान्वित केला.