डोंबिवलीत सोनाराला सव्वा चार लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला कल्याण क्राइम ब्रांचने ठोकल्या बेड्या

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली येथील एका ज्वेलर्सला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवुन तब्बल सव्वा चार लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या चोरट्याला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने २४ तासाच्या आत बेड्या ठोकून गजाआड केले.चोरट्याने सोन्याचे दागिने ज्या सोनाराला विकले त्या सोनाराकडून पोलिसांनी दागिने हस्तगत करणार असल्याचे सांगितले.सोनाराच्या दुकानातील सीसीटीव्ही मुळे चोरटा कैद झाला आहे.

मिळालेल्या महितीनुसार, अंबरनाथ पश्चिम येथील जुना गायकवाड पाडा येथे विनय लोहिरे राहत आहे. डोंबिवली पूर्वेकडील नार्वेकर ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या विनयने दागिन्याची किमंत एनइएफटी द्वारे दुकानाच्या खात्यात ट्रान्स्फर केल्याचे भासवून दुकानातून ४ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले. दुकानदाराने पैसे न मिळाल्याचे सांगताच विनय याने त्याना पैसे पाठविल्याचा खोटा मेसेज दाखवत विश्वास संपादन करण्यासाठी चेकद्वारे देखील पैसे दिले . मात्र यानंतर देखील खात्यात पैसे न आल्याने शहानिशा केली असता आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर दुकानदाराने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.सोनाराच्या दुकानात घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने दुकानातील सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक पद्धतीने तपास सुरु केला.चोरटा अंबरनाथ येथे राहत असल्याची माहिती मिळताच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने चोरट्याला घरातून ताब्यात घेतले. अटक आरोपीविरोधात पुणे आणि ठाणे येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याचे कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी मोहन कळमकर यांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण दायमा , पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन,मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मालशेटे,पोलीस हवालदार-अरविंद पवार,निवृत्ती थेरे,सुरेश निकुळे,दत्‍ताराम भोसले,घोलप आदी या कारवाईत सहभागी होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web