५५ वर्षे आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी सोलापूर येथे निधन

सोलापूर/अशोक कांबळे – शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते गणपतराव देशमुख यांचे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले असून मृत्यू समयी त्यांचे वय ९५ होते.काही दिवसांपूर्वी त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वारंवार रुग्णालयाकडून सांगण्यात येत होते परंतु शुक्रवारी रात्री काळाने त्यांच्यावर घाला घातला व त्यांची प्राणज्योत मालवली.

गणपतराव देशमुख यांची कर्मभूमी सांगोला तालुका असला तरी त्यांचे मूळ गाव मोहोळ तालुक्यातील पेनूर होते.त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण पेनूर या त्यांच्या मूळ गावात झाले.सांगोला तालुका त्यांची कर्मभूमी असून ११ वेळेस त्यांनी या तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व केले होते.

मागील काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी होण्याची जिकडे खात्री, तिकडे जाण्याचा पायंडाचं पडला आहे. मागील काही निवडणुकांपासून याचं जवळून दर्शन होऊ लागलं आहे. पण अशा काळात गणपतराव देशमुख यांनी विचारधारा आणि पक्षनिष्ठेला तडा न जावू देता आदर्शवादी परंपरा जपली. म्हणून त्यांची कधी आमदारकी गेली नाही. उलट मोदी लाटेतही ते आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले. गणपतराव देशमुख यांना लोक प्रेमाने आबासाहेब म्हणत.

गणपतराव देशमुख यांचा जन्म १० आँगस्ट १९२६ साली झाला होता.त्यांचे मूळ गाव मोहोळ तालुक्यातील पेनूर होते.हे गाव मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर वसलेले आहे. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांचा स्वातंत्र्य चळवळीकडे कल वाढला. काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधु आप्पासाहेब पवार आणि गणपतराव देशमुख रूममेट होत.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकत १९६२ ची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते सांगोल्याचे आमदार झाले. त्यांची ही वाटचाल दोन निवडणुका सोडल्या तर सुरूच होती.आमदार होऊन पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या गणपतरावांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणाबद्दल यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांचं कौतूक केलं होतं.

गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर तब्बल ११ वेळा ते आमदार राहिले होते.त्यांनी ५५ वर्षे विधानसभेचे नेतृत्व केले.या काळात त्यांनी दोन वेळा मंत्री म्हणून काम केलं. विशेष म्हणजे लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतला.

एकाच पक्षात राहून ११ वेळा आमदार झालेल्या गणपतराव देशमुख यांनी आमदारकी कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. सहकाराबरोबर तालुक्याच्या पाण्यासाठी आणि इतर विकास कामांसाठी ते हिरारीने पुढाकार घेत. विरोधी पक्षात राहूनही कामं करता येऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले. मंत्रीपदं गेल्यानंतर लागलीच शासकीय गाड्यांचा त्याग करणाऱ्या गणपतरावांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला. आमदारकीचा कुठलाही रूबाब न दाखवता लोकसेवेचं काम त्यांनी केलं. वयाच्या ९४ व्या वर्षी गणपतरावांनी निवडणूक (२०१९ ची विधानसभा निवडणूक) न लढवण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत लोक त्यांच्याकडे निवडणूक लढवावी असा हट्ट धरून बसले होते. इतकं प्रेम जनतेनं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून केलं. आमदारकीसाठी पक्ष सोडणाऱ्या आजच्या राजकीय काळात गणपतराव देशमुखांनी एका पक्षात राहुन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. अगदी मोदी लाटेतही आबासाहेबांना लोकांनी आमदार केलं. पण आमदारकी त्यांनी कधी डोक्यात जाऊ दिली नाही. त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवली. त्यामुळेच एका पक्षात राहून ते तब्बल ५५ वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले.

सांगोला तालुका शोकाकुल

आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला होता.त्यांनी या तालुक्याचे तब्बल ५५ वर्षे नेतृत्व केले.ते कायमच जनतेशी जोडले गेलेले नेते होते.त्यांच्या निधनाने सांगोला तालुका शोकसागरात बुडाला असून अनेक गावात श्रद्धांजलीचे होर्डिंग लागले आहेत.

त्यांच्या मूळ गावात ही पार्थिवाचे अंत्यदर्शन

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव असलेल्या मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात काही वेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी गावातील आबालवृद्ध,महिला,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी भावुक होत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

सांगोला येथे होणार अंत्यसंस्कार

माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याचे तब्बल ५५ वर्षे नेतृत्व केले.त्यांच्या निधनाने सांगोला तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांचे पार्थिव काही काळासाठी त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर सांगोला येथील सूतगिरणीच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web