पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे/प्रतिनिधी –  पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते,  या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’मुळे  पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. पुणे मेट्रोने उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करावे. कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम  गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, जिल्हाधिकारी  डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.

अत्याधुनिक, आरामदायी प्रवासाचे  जलद व वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे  स्वप्न पूर्ण करणारी ट्रायल रन ठरणार असल्याचे सांगून उपुमख्यमंत्री श्री अजित पवार म्हणाले, पुणेकरांना निर्धारित वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या  वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे  गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच  पूर्ण होईल. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेचे  काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरु होते. 60 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. अत्यंत वेगाने, विश्वासाने, निर्धाराने,कोणताही अपघात न होता, हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यात महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांची मोठी मेहनत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे मेट्रोची, सगळ्या मार्गांची कामे  पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानंतर, सायकल, मोटरसायकल, दुचाकीचं शहर अशी ओळख असणारं पुणे शहर, हे मेट्रो वाहतुकीचं शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदूषणाचा ताण कमी होईल. वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारित वेळेत पोहचू शकतील, दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील,  असा विश्वास व्यक्त करतानाच मेट्रो रेल्वेसेवा ही प्रदूषणविरहीत सेवा असल्याने  प्रदूषण होणार नाही. रस्त्यांवरची वाहने  कमी झाल्याने, त्या माध्यमातून होणारे प्रदूषणही कमी होईल.  पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोडचे नियोजन आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही परिस्थितीत पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी, २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पुलावरुन धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोचं एकूण काम जवळपास ६० टक्के पूर्ण झालं आहे. पुणे मेट्रोनं उर्वरित काम जलद गतीनं पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीच्या बैठकीत, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिध्दीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  मान्यता दिली आहे. त्यामुळे  पुण्याला, सर्वोत्तम महानगर विकसित करण्याच्या दिशेने  वाटचाल सुरु झाली आहे. या विकास आराखड्यात २ रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स, ५ शैक्षणिक केंद्रे, २ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र असे महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६ हजार ९१५ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे  आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

विधान परिषदेच्या उपसभापती  डॉ नीलमताई  गोऱ्हे  यावेळी म्हणाल्या, पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होणार आहे, आयटीचे क्षेत्र म्हणून पुणे शहर प्रभाव वाढवते आहे, त्यात मेट्रोची भर पडणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल,  दिल्ली, नागपूरकरांचा मेट्रोचा अनुभव चांगला आहे, आता हाच अनुभव पुणेकरांना अनुभवण्यास मिळणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा ऐतिहासिक क्षण आहे. केंद्र व राज्य शासनाने मेट्रोच्या कामाला गती दिल्याने हा क्षण आज अनुभवता आला. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करता आजची मेट्रो ट्रायल रन महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार चंद्रकांत पाटील यांनी  पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे.  डिसेंबर 2022पर्यंत मेट्रोचे सर्व मार्ग सुरू होतील, वाहतूक कोंडी कमी होईल. असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले. यावेळी कोरोनाचे निर्बंधाचे पालन करून मेट्रोचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

  1. देशातील सर्वात हलके मेट्रो कोच:

कमी वजनाच्या अ‍ॅल्युमिनियम बॉडीसह बनलेले.

डिझाइन गती 95 किमी प्रतितास.

प्रवासी क्षमता 975 पॅक्स / 3 कार ट्रेन (6 कारसाठी विस्तारित करण्याची क्षमता)

  1. सुरवातीपासून सौर ऊर्जेचे एकत्रीकरण:

11.19 मेगावॅटएकूण सौर उर्जा स्थापित करण्याची योजना.

त्यामुळं प्रति वर्षी 20 कोटींची बचत.

दर वर्षी अंदाजे 25 हजार टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनापासून सुटका.

  1. नाविन्यपूर्ण यूजी स्टेशनची रचना: एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड)

दोन मेट्रो स्थानके: मंडई व बुधवारपेठ मेट्रो स्थानकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणार.

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं जागेची बचत झाली.

शहरातील सुमारे 200 रहिवाशांचे पुनर्वसन टाळले.

  1. 4. ‘कचरे से कांचन तक’डम्पिंग साइटचे डेपोमध्ये रूपांतर :

कोथरूड कचरा डम्पिंग साइट १२.२ हेक्टर क्षेत्रामध्ये पसरली आहे.

3 लाख 80 हजार घनमीटर कचरा असणाऱ्या या जागेची रुपांतर सुंदर परिसरात होणार.

  1. कार्यक्षम पाणी व्यवस्थापन :

*सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रीया करण्यासाठी ‘अनॅरोबिक बायोडायजेस्टर तंत्रज्ञाना’चा वापर करण्यासाठी ‘डीआरडीओ’सोबत सामंजस्य करार.

*बहुतांश स्थानकांमधून मनपाच्या गटारलाईनमध्ये सांडपाणी सोडण्यात येणार नाही.

*प्रत्येक स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणार.

  1. वृक्षारोपण आणि पुनर्रोपण :

शक्यतो झाडे तोडायची नाहीत ही महामेट्रोची पॉलिसी आहे, नाईलाजाने झाडे काढण्याची वेळ आल्यास ती न तोडता त्या झाडांचं ‘रुट बॉल’ पध्दतीनं पुनर्रोपण करण्यात येते.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 1 हजार 698 झाडांच पुनर्रोपण तर 11 हजार 683 नवीन झाडांची लागवड करण्यात आली.

  1. ‘पीपीपी’ तत्वावर पार्किंग कम कमर्शियल डेव्हलपमेंट नियोजित ठिकाण :

*स्वारगेट मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब – 2.10 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.

*सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन – 1.02 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.

*रेंज हिल डेपो -2.09 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.

*हिल व्ह्यू कार पार्क डेपो, कोथरूड –1.87 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web