सोलापूरच्या मनोज धोत्रेची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात एण्ट्री

सोलापूर/अशोक कांबळे – बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात भारतीय दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा झाली असून त्यात मोहोळ येथे राहणार्‍या मनोज धोत्रे या अष्टपैलू खेळाडूची निवड भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात झाली आहे. भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाल्याने मनोजच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सोलापूर जिल्ह्याच्य मोहोळ शहरातील अादर्शनगर येथे राहणारा ३८ वर्षीय मनोज धोत्रे हा पायाने दिव्यांग अाहे. लहानपणी त्याला पोलिओच्या आजाराने ग्रासले होते. यात त्याचा पाय निकामी झाला. आपल्या व्यंगत्वावर मात करत त्याने आपले क्रिकेटमधील कौशल्य सिद्ध करून दाखवले. मनोजने डीएडपर्यंतचे शिक्षण मोहोळ येथून पूर्ण केले. क्रिकेटच्या आवडीपायी त्याने शिक्षणाला रामराम ठोकला. त्याने आपल्या क्रिकेटची सुरवात बॉलबॉय म्हणून सुरुवात केली होती. अाज तो एक ऑलराऊंडर म्हणून नावारुपास आला आहे.

मनोजचा मोठा भाऊ रूपेश धोत्रे यांच्यापासून प्रेरणा  घेत त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना त्याला दिव्यांग क्रिकेट संघाविषयी माहिती मिळाली आणि त्याने क्रिकेट खेळण्यावर अधिक जोर दिला. विविध संघाकडून तो जिल्हा पातळीवर क्रिकेट खेळू लागला. जिल्हास्तरावर त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत छाप सोडली. त्याच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर त्याला महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघात स्थान मिळाले. पुढे त्याच्याकडे मुंबई दिव्यांग क्रिकेट संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. तो तीन वर्षे या संघाचा कर्णधार होता.  

गतवर्षी हैदराबाद येथे झालेल्या दिव्यांग क्रिकेट संघाच्या शिबिरात त्याने आपल्या कामगिरीने निवड समितीला प्रभावित केले. आणि त्याला भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात संधी मिळाली. सोमवारी त्याला निवड समितीचे पत्र मिळाले असून लवकरच तो भारतीय संघात सामील होईल. १२ अॉगस्टपासून सुरु होणार्‍या बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार वसंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मनोज आता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल. भारतीय संघात त्याची निवड होणे ही सोलापूर वासीयांसाठी खरोखरच अभिमानास्पद बाब असून सर्वत्र त्याच्या निवडीबद्दल कौतुक होत आहे.

तो प्रहार दिव्यांग संघटनेचा मोहोळ तालुका अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहे. क्रिकेट शिवाय मनोज त्याच्या इतर दिव्यांग मित्रांना प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करतो, शिवाय दिव्यांगांना पेन्शन मिळवून देण्यासाठी अर्ज भरून देणे यासारखी कामे करत असतो. मनोजचे कुटुंब मोठे असून त्याला ५ भाऊ आणि ४ बहिणी आहेत. आई आणि त्याचा एक भाऊ डॉक्टर आहेत. हे सर्व जण त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठबळ देतात. तो विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.  

 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web