कल्याण डोंबिवलीला पावसाने झोडपले, २४ तासांत १७७.५ मिलिमीटर पावसाची नोंद

कल्याण/प्रतिनिधी- रविवार दुपारपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. सकाळपासून तुफान बरसणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भाग पुन्हा जलमय झालेले पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत कल्याण डोंबिवली परिसरात या 177.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने मध्यरात्री 2 नंतर काहीशी विश्रांती घेतली. आणि सकाळी 9 च्या सुमारास पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नेहमीच्या सखल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळाले.
कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जरीमरी मंदिर, बाजारपेठ आणि पूर्वेतील दुर्गामाता मंदिर रोड परिसर तर डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसर, नेहरू रोड, नांदीवली, एमआयडीसीचा काही भाग आदी परिसर पावसामुळे जलमय झाला. दुपारी 3 नंतरही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय कल्याण पूर्वेतील शांतीनगर, शिवाजी नगर परिसरात ओम टॉवरजवळील सखल भागात असणाऱ्या घरांमध्येही वालधुनी नदीचे पाणी शिरू लागल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.
दरम्यान काही काळ विश्रांती घेऊन मग जोरदार बरसत असणाऱ्या पावसाने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली असून पावसाचे प्रमाण पाहता पालिका प्रशासनही सध्या अलर्टवर आहे.

गेल्या 24 तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये 177 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून हा अतिवृष्टीचा पाऊस आहे. काल दुपारपासून आपली सर्व यंत्रणा सतर्क असून काही ठिकाणी नागरिकांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे. घरात पाणी शिरण्यापूर्वी नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आमची सर्व यंत्रणा कार्यरत असून इंटिग्रेटेड कमांड सेंटरमध्ये 700 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web