३० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांची महावितरण कडून विशेष तपासणी मोहिम

कल्याण/संघर्ष गांगुर्डे  – एकीकडे वाढलेल्या वीजबिलांमूळे लोकं चिंतेमध्ये असताना दुसरीकडे मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडळात तब्बल 20 टक्के ग्राहकांचा वीज वापर 30 युनिटपेक्षा कमी किंवा असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. त्यामूळे अशा 30 युनीटपेक्षा कमी वापर असणाऱ्या तब्बल 4 लाख 44 हजारांहून अधिक ग्राहकांची महावितरणतर्फे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करून महसूल वाढीच्या उद्देशाने ३० जुलैपर्यंत ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

कल्याण परिमंडळात आतापर्यंत ३० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 4 लाख 44 हजार 238 असून त्यापैकी 3 हजार ग्राहकांची नुकतीच पडताळणी करण्यात आली. ज्यात बहुतांश ठिकाणी नादुरुस्त किंवा बंद वीजमीटर, मीटरचे सील तुटणे, घराच्या आत मीटर असणे, मीटरशी छेडछाड किंवा वीजचोरी, वीजभारात बदल, चुकीचे रिडींग आदी बाबींमुळे वीजवापर कमी असल्याचे आढळून ल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
यामुळें होणारे नुकसान टाळण्यासाठी महावितरणकडून सर्वच्या सर्व ग्राहकांच्या पडताळणीची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय 1अंतर्गत असे सुमारे 80 हजार 849 तर ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि उल्हासनगरचा समावेश असणाऱ्या मंडल कार्यालय 2 अंतर्गत 1 लाख 3 हजार 435, वसई -विरारचा समाविष्ट असणाऱ्या वसई मंडळ कार्यालयांतर्गत सर्वाधिक १ लाख ५६ हजार ६६१ आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या पालघर मंडळात 1 लाख 3 हजार 293 ग्राहकांचा दर महिन्याचा वीज वापर ३० युनिटपेक्षा कमी असल्याचे महावितरणला आढळून आले आहे. त्यामुळे या सुमारे साडेचार लाख ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे.

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु असून तपासणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विभाग तसेच उपविभागीय स्तरावर विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून मोहिमेच्या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. या तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी ग्राहकांना केले आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web