राखेचे रेल्वेद्वारा वहन करण्याच्या प्रयोगाला उर्जामंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा

चंद्रपूर/प्रतिनिधी – राखेचा महत्तम विनियोग, पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित वापर करण्याकरीता रेल्वेद्वारे राख वहन करण्याचे महानिर्मितीने उचलले पाऊल अभिनंदनीय आहे. आगामी काळात राखेचे महत्त्व वाढून आर्थिक स्त्रोत निर्माण होणार आणि इतर उद्योगांनासुध्दा उभारी मिळेल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील  राखेने  भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवतांना ते बोलत होते.  यावेळी सुमारे 59  वॅगनमध्ये 4200 मेट्रिक टन राख रेल्वेद्वारे रवाना करण्यात आली.

कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आभासी पद्धतीने महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) व्ही.थंगापांडीयन, संचालक(वित्त) बाळासाहेब थिटे तर चंद्रपूर येथुन महानिर्मितीचे संचालक(खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक(पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ, मुख्य अभियंता पंकज सपाटे, ॲशटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय मानधनिया, मध्य रेल्वेचे के. एन. सिंग, अंबुजा सिमेंट कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी नीरज बंसल, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, या प्रयोगाचे यशापयश बघून महानिर्मितीच्या कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधूनही रेल्वेद्वारे राखेची वाहतूक करण्याचे नियोजन आहे. रेल्वेद्वारे एकावेळी मोठ्या प्रमाणात राख वाहून नेता येते. शिवाय रेल्वेद्वारे राख वहन केल्यास अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होते. महानिर्मितीच्या राख साठवण बंधाऱ्यापर्यंत राख वाहून नेण्याच्या खर्चासोबत राख साठवण बंधाऱ्याची ऊंची वाढवण्याच्या कामाच्या खर्चात देखील बचत होते. राख वाहून नेणाऱ्या बल्करमधून एका वेळेस साधारणत: 20 ते 22 मेट्रिक टन राख वाहून नेता येते. मात्र रेल्वेद्वारे एका वेळेस साधारणत: 3500 ते 4000 मेट्रीक टन राख कमी खर्चात वाहून नेता येते.

रेल्वेद्वारे राखेला मुंबई, पुणे तसेच सिमेंट उद्योग आणि आर.एम.सी.प्लांट असलेल्या ठिकाणी नेता येऊ शकते.  बल्करसाठी  सरासरी सात रुपये प्रती किलोमीटर प्रती मेट्रिक टन एवढा खर्च येतो. मुंबई बाजारपेठेत राखेचा दर अंदाजे 1800 रुपये प्रती मेट्रिक टन इतका आहे. पहिली खेप पाठविणारी एजन्सी मेसर्स अॅशटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड  असून चंद्रपूर वीज केंद्रातून ए.सी.सी. अंबुजा चंद्रपूर प्लांट मध्ये रेल्वेद्वारे राख वाहतुकीचा खर्च 95 रुपये प्रती मेट्रिक टन आहे तर बल्करद्वारे हाच खर्च 300 रुपये प्रती मेट्रिक टन इतका येतो.

चंद्रपूर वीज केंद्रात दररोज 16 हजार मेट्रिक टन ओली आणि कोरडी राख तयार होते. राखेचा 100 टक्के विनियोग करण्यासंबंधी वने, पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने निकष ठरवून दिलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट उद्योग आणि लघु उद्योगांमध्ये चंद्रपूर वीज केंद्रातील राख काही प्रमाणात उपयोगात आणली जाते. परंतु कोराडी व खापरखेडा  विद्युत केंद्राच्या परिसरात असे मोठ्या प्रमाणात राखेचा वापर करणारे उद्योग नसल्यामुळे तिथे राखेची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न वीज प्रशासनासमोर आहे. यासाठी महानिर्मितीने राखेची गरज असलेल्या भागामध्ये रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची चाचपणी ह्या निमित्ताने केली आहे.

मानवासाठी विद्युत ही अत्यावश्यक बाब आहे. विजेची आवश्यकता लक्षात घेता विजेचे दर कसे कमी करता येईल, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. येथील औष्णिक विद्युत केंद्रामुळे झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच सकारात्मक पाऊले उचलली जातील. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार श्री. धानोरकर म्हणाले, उर्जा विभागात डॉ. नितीन राऊत यांच्यामुळे एक नवीन उर्जा आली आहे. वीज निर्मितीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग राबविले जात आहे. चंद्रपूर येथून रेल्वेद्वारे राख वाहून नेण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. ही राख देशातील इतरत्र भागात जाईल. तसेच शिल्लक असलेल्या 30 लाख टन राखेचे योग्य नियोजन झाले तर रोजगार निर्मितीस मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. महनिर्मितीचे सी.एम.डी. संजय खंदारे म्हणाले की, ऊर्जा मंत्र्यानी निर्देशित केल्याप्रमाणे राखेची समस्या सुटणार आहे सोबतच प्रदूषण आणि अपघात कमी होण्यास हातभार लागेल या प्रयोगाच्या यशस्वी चाचणी नंतर इतर वीज केंद्रात रेल्वेद्वारे राख पाठविण्याचे नियोजन आहे.

प्रारंभी  प्रास्ताविकातून पुरुषोत्तम जाधव यांनी या अभिनव प्रयोगाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार सविता फुलझेले यांनी केले. याप्रसंगी उपमुख्य अभियंते राजेश राजगडकर, किशोर राऊत, राजेशकुमार ओसवाल, मदन अहिरकर तसेच अधीक्षक अभियंते सुहास जाधव, भास्कर इंगळे, अनिल गंधे, अनिल पुनसे, विजया बोरकर, पुरुषोत्तम उपासे, सुनील कुळकर्णी,  मिलिंद रामटेके, महेश गौरी, प्रभारी आर.के.पुरी, सराफ, महेश राजूरकर तसेच वीज केंद्र, प्रकल्प, स्थापत्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

महाऔष्णिक विद्युत केंद्रातील राखेने भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा घेतला. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, महानिर्मितीचे संचालक(खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक(पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ, मुख्य अभियंते पंकज सपाटे, श्री.देशपांडे, श्री. वाळके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, इरई नदीवरील सौर उर्जा प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी पूर्णवेळ अधीक्षक अभियंत्याची तात्काळ नेमणूक करा. दर आठवड्याला तांत्रिक कामांचा आढावा कसोशीने होणे गरजेचे आहे. तसेच औष्णिक विद्युत केंद्रात संशोधन विकास विभाग सुरू करावा. तांत्रिक घटनांचे विश्लेषण, डाटाबँक विकसित करावी. रोबो आणि आर्टिफिशियल इंटिलीजन्स प्रणालीचा वापर करून अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.  जेणेकरून अशा संशोधनामधून आणि केस स्टडीमधून कंपनीची प्रगती होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

ऊर्जामंत्र्यांना विद्युत केंद्राची माहिती देतांना मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी सांगितले की, मागील काही महिन्यात अनेक बाबींमध्ये प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली व वीज उत्पादनाची कार्यक्षमता वाढली.  रस्ता मार्गे वाहतूक होणाऱ्या कोळशामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी कोळसा वाहून नेणा-या पाईप कन्व्हेयरचे काम पूर्णत्वास आले असून ऑगस्ट 2021 मध्ये या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ नियोजित आहे, असे ते म्हणाले.

बैठकीला औष्णिक विद्युत केंद्रातील विविध विभागाचे अधिकारी, अभियंते आदी उपस्थित होते. आढावा बैठकीपूर्वी ऊर्जामंत्री यांनी 500 मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक 8 व 9 च्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि अभियंत्यांशी संवाद साधला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web