भिवंडी/प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू आहे. या वाढत्या इंधन दरवाढ व महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती वापरातील गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे.
सोमवारी भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे भिवंडी- चिंचोटी – वसई मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला . या आंदोलनादरम्यान महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कमलाकर टावरे,तालुका अध्यक्ष गणेश गुळवी,ठाणे जिल्हा सचिव महेंद्र पाटील,तालुका उपाध्यक्ष देविदास पाटील,जि.प.सदस्य रत्ना तांबडे,जिल्हा उपाध्यक्ष नितेश पाटील,युवक अध्यक्ष योगेश म्हात्रे,उपसरपंच रेश्मा पाटील इत्यादी राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.