ठाणे जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सन्मान

ठाणे/प्रतिनिधी– जिल्ह्यातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देणारे उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. कृषिदिनाच औचित्य साधून आज त्यांच्याहस्ते जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रानभाज्या महोत्सव आणि कृषी संजीवनी मोहिमेचा समारोपही करण्यात आला. यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे आणि श्री. भागवत यांनी कृषी क्षेत्रात केलेलं काम उल्लेखनीय असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी सुचवलेले पर्याय वापरून शेती करण्याची गरज असल्याचे गौरवोद्गार काढले. त्यासोबतच त्यांनी शोधलेल्या एसआरटी पद्धतीने भातशेती केल्याने शेतकऱ्यांचे श्रम वाचतील, पैसे वाचतील आणि त्याला जास्त उत्पन्न मिळू शकेल त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्ह्यात आधी भात आणि नाचणी ही दोनच पिके घेतली जायची मात्र आता भेंडी, भोपळी मिरची, काकडी, हळद अशी अनेक पिकं घेतली जातात. कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याबाबत मार्गदर्शन केल्यानेच आज यातील काही भाजा परदेशात निर्यात होत आहेत. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे, स्थानिक हवामान पाहून त्यानुसार पिकांचे पॅटर्न ठरवले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गडचिरोली प्रमाणेच ठाणे जिल्ह्यात देखील स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट यासारखे जास्त नफा देणारी पिके घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील आवर्जून नमूद केले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले कृषीतज्ज्ञ शेखर भडसावळे यांनी देखील शेतकऱ्यांना नवीन पध्दतीने शेती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं. एसआरटी ही भात लागवडीची पद्धत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून येत्या काही वर्षात ती या जिल्ह्याचे अर्थकारण पुरते बदलून टाकेल आणि शेतकऱ्यांना नवीन आत्मविश्वास देईल, असे मत त्यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांना वस्तूंचे वाटप21 जून ते 01 जुलै या कालावधीत जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीमे अंतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यानुसार यावर्षी देखील रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याशिवाय शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी छत्री, वजनकाटा, प्लॅस्टिक कॅरेटस आणि स्टँड याचे वाटप पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.

त्यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील आशा कीटक नाशक फवारणी करतांना घेण्याची काळजी, औषधी वनस्पती लागवड करताना घ्यायची काळजी, भात आणि भेंडी लागवड पद्धती पुस्तिकांचे प्रकाशन पालकमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते करण्यात आलं. प्रगतशील शेतकाऱ्यांचा सन्मानयाच कार्यक्रमात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, जिल्हास्तरिय हरभरा पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी आणि भात आणि भेंडी लागवड स्पर्धेतील विजेते शेतकरी यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. रानभाज्यांच्या प्रदर्शनाला दिली पालकमंत्री यांनी भेट नियोजन भवन येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्वयं सहाय्यता समुहातील महिलांनी आणलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषि सभापती संजय निमसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, जिल्हा परिषद कृषि अधिकारी श्रीधर काळे, आणि कृषिरत्न पुरस्कार विजेते आणि कृषीतज्ञ शेखर भडसावळे उपस्थित होते

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web