अंघोळीची गोळी संस्थेने वडाच्या झाडांला केले धागेदोरे मुक्त, परिसरही केला स्वच्छ

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नुकतीच वटपौर्णिमा साजरी झाली असून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला धागेदोरे बांधण्यात येतात तसेच इतर साहित्य देखील ठेवण्यात येते.  यामुळे वडाच्या झाडांचा परिसर स्वच्छ करण्यासाठी अंघोळीची गोळी संस्था सरसावली असून त्यांनी वडाची झाडे धागेदोरे मुक्त करत वडाच्या झाडांचा परिसर स्वच्छ केला आहे.  

अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने नुकतेच कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या वडाच्या झाडांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच वडाच्या झाडांना धागेदोरे मुक्त करण्यात आले. भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी आपल्या संशोधनात झाडांना देखील संवेदना असतात हे स्पष्ट करून दाखवले आहे. त्यामुळे नागरिकांची कळत नकळत होणारी कृती झाडांना हानीकारक ठरत असल्याचे संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

आपल्या परिसरातील वडाचे प्रत्येक वृक्ष कसे सुरक्षित राहील यांची खबरदारी घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. पुजेसाठी वडाच्या फांद्या अनधिकृतपणे तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई  व्हावी तसेच वडाच्या झाडांना कचरा टाकण्याचे ठिकाण बनवले जावु नये यांसाठी आमचा प्रयत्न चालु असल्याचे अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले. गेल्या पाच वर्षात भारतातील सव्वा लाख हेक्टर जंगल नष्ट झाले आहे, त्यातंच वडाचे महत्व सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

वडाच्या झाडाच्या संरक्षणासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक वडाच्या झाडावर करडी नजर ठेवावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी झाडांना होणार नाही यांसाठी संबंधित विभागाने पोलीस विभागाची मदत घ्यावी त्याचबरोबर शक्य असल्यास महानगरपालिकेच्या माध्यमाने पुजेसाठी महिलांना मोफत वडाच्या रोपट्यांचे वाटप देखील संबंधित विभागाला करता येवु शकते ही अभिनव संकल्पना देखील संस्थेने सुचवली आहे. यावेळी दत्ता बोंबे, भुषण राजेशिर्के, अक्षदा वाऊळ, धनश्री वाळंज उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web