डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपन्यातील प्रदूषणाचा स्तर शून्यावर आणण्यासाठी कल्याण अंबरनाथ असोसिएशनच्या ( कामा संघटना ) वतीने प्रयत्न सुरु आहेत.डोंबिवली सीईटीपी अंतर्गत सध्या कारखान्यातील सांडपाण्यावर बायोनेस्ट सिस्टीमच्या बायोकल्चरच्या माध्यमातून प्रक्रिया सुरु आहेत.यामुळे नैसर्गिकरित्या सांडपाण्यावर प्रक्रिया होत असून सांडपाण्यातील रासायनिक घटक समूळ नष्ट केले जात आहेत.बायो कल्चर पध्दतीने प्रक्रिया झालेले पाणी रंगहीन आणि गंधहीन तयार होत आहे.त्यामुळे डोंबिवलीतील जलप्रदूषणाची पातळी खाली येणार आहे. विविध कारखान्यात उत्पादक कोळसा वापरतात यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होते.मात्र कामा संघटनेच्या वतीने डोंबिवलीतील सव्वाशे कारखान्यात चिमणीद्वारे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कारखान्यात विशिष्ट डिव्हाईस बसविण्यात येणार आहे.कामा संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत हि बाब स्पष्ट करण्यात आली.
या परिषदेला कामा संघटनेचे अध्यक्ष डॉ.देवेन सोनी, सचिव राजू बैलुर, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी, कार्यकारिणी सदस्य उदय वालावलकर, आशिष भानुशाली, जयवंत सावंत उपस्थित होते. डोंबिवलीतील कारखान्यांच्या माध्यमातून रोजगार आणि महसूल निर्मिती सोबत सामाजिक दायित्व निभावले जात आहे.कोरोना काळात अनेकजण बेरोजगार झाल्याने कामा संघटनेने रोजगार उपलब्ध करून दिले. तसेच गरिबांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कारखान्यांना एमआयडीसी आणि कल्याण डोंबिवली महापालिका पायाभूत सुविधा देण्यासाठी अकार्यक्षम आहेत.केंद्र किंवा राज्य सरकारने उद्योजकांच्या हितासाठी लागू केलेल्या अनेक योजनांना या दोन्ही संस्थांनी कात्री लावली अशी खंत कामाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.मानवी प्रयत्नांद्वारे प्रदूषणाचा स्तर कमी करण्याचे अटोकाट कार्य कामा करीत आहे.कोरोनामुळे सुक्ष्म,लघु,आणि मध्यम उद्योजकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे.मात्र सरकारच्या वतीने त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही.उद्योजकांच्या हितासाठी सरकारचे धोरण सकरात्मक असावे अशी कामा संघटनेची अपेक्षा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.२०१९ साली कामा संघटनेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील दुसरा वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात आले.कोरोना काळात सामाजिक बांधिलकी म्हणून जपल्याबद्दल संघटनेने राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.देवेन सोनी यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फौंडेशनच्या वतीने`दि ग्लोबल बेस्ट सोशल वर्कर पुरस्कार`देण्यात आला.
डोंबिवली एमआयडीसी आणि कल्याण –डोंबिवली महानगरपालिका महानगरपालिका या संस्था कारखानदारांकडून विविध कर वसूल करत असते. मात्र त्याबदल्यात आवश्यक अश्या सोयी-सुविधा पुरवित नाही अशी खंत यावेळी कामा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.तर चेंबर मधील विषारी वायूमुळे कामगारांचा जीव जाऊ याचा विचार करत या संघटनेने पालिकेला विषारी वायू परिक्षण सेवा मोफत देऊ केली होती ,मात्र प्रशासनाने यावर कानाडोळा केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.