कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार असून रुग्णालयाला सुसज्ज आणी अत्याधुनिक कसं करता येईल यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी केली.
कल्याण हे मध्य रेल्वेचे महत्वाचे जंक्शन असल्यामुळे रेल्वे स्थानकानजिक असलेल्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात कायमच रुग्णांची गर्दी दिसून येते. या रुग्णालयाचा कायापालट करण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानक रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट देवून रुग्णालयाची पाहणी केली. ही पाहणी करतांना त्यांनी रुग्णालयामागे असलेल्या कर्मचारी वसाहतीलाही भेट देवून तेथिल पाहणी केली. रुक्मिणीबाई रुग्णालयामागे तळ मजल्यावर ऑक्सिजन प्लँटसाठी राखीव असलेल्या जागेची देखील त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड, मॅटर्निटी वॉर्ड यांना भेट देवून तेथे सुधारणा करणेबाबत संबंधितांना सुचना दिल्या. यावेळी त्यांनी पहिल्या मजल्यावर काम सुरु असलेल्या १० खाटांच्या अतिदक्षता कक्षाची तसेच मॉडयुलर ऑपरेशन थिएटर यांची पाहणी केली.
रुक्मिणीबाई रुग्णालय हे कल्याण मधील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे रुग्णालय आहे आणि या रुग्णालयात मोठया प्रमाणात ओपीडीला गर्दी असते, या रुग्णालयाचे एक वेगळेच महत्व आहे. शास्त्रीनगरच्या धर्तीवर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आजूबाजूस सिटी स्कॅन आणि एम.आय. आर. ची सुविधा कुठे करता येईल, एक सुसज्ज रुग्णालय कसे उभे करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी रुग्णालयाची पाहणी केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. यावेळी वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैदयकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, उप अभियंता भालचंद्र नेमाडे, वैदयकीय अधिकारी समिर सरवणकर उपस्थित होते.