डोंबिवलीत नवीन रेल्वे मार्गासाठी बाधित घरे तोडण्याची कारवाई सुरू

डोंबिवली/प्रतिनिधी– मध्य रेल्वेच्या महत्वाकांक्षी डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पामध्ये बाधित होणारी घरं तोडण्याच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली. त्याअंतर्गत डोंबिवली पूर्वेतील आयरे गावात रेल्वेमार्गाला लागून असणारी घरं रेल्वेकडून जमिनदोस्त करण्यात आली.मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या या डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पाचे काम गेल्या काही वर्षांपासून सूर झाले आहे. देशातील सर्वात व्यस्त असणाऱ्या जेएनपीटी प्रकल्पाला हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. जेणेकरून मालवाहतुकीची क्षमता वाढवण्यासह त्याच्या वेळेतही बचत होऊ शकणार आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या 3 जिल्ह्यांतून या प्रकल्पाचा मार्ग जात आहे. त्यात डोंबिवलीच्या आयरे परिसरात 273 घरं बाधित होत असून त्यापैकी 105 रोख मोबदला देण्यात आला आहे. अशा 105 पैकी 73 घरांवर आज तोडक कारवाई करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे चीफ जनरल मॅनेजर राजीव त्यागी यांनी दिली. तसेच उर्वरित लोकांनाही आम्ही रोख मोबदला देण्यासाठी इच्छुक असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान या प्रकल्पात बाधित होणाऱ्या काही प्रकल्पग्रस्तांना केडीएमसीच्या बीएसयूपी अंतर्गत कचोरे येथे बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये रेल्वेने घरं विकत घेऊन दिली आहेत. त्यामुळे आज ही कारवाई सुरू करण्यात आली असून आता या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web