डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात योग दिन साजरा

कल्याण/प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून  डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर, सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून योग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सध्या रुग्ण संख्या कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी झाले आहे. परंतु कोविडचे संकट टळले आहे असे समजून निर्धास्त राहू नका, मोठ्या प्रयत्नांनी  कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तरी  सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्कचा कटाक्षाने वापर करणे, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे अवलंब करावा, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. जरी लसीकरणाचे 2 डोस झाले असले तरीही ही बंधने पाळावीत असेही ते पुढे म्हणाले.

 कोविडच्या पहिल्या लाटेत टीव्हीवर सतत दिसत असलेल्या कोविड विषयक बातम्या आणि त्यामुळे त्याचा जनमानसावर येणारा ताण दूर व्हावा याकरिता  नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेने गेल्या वर्षभरात जवळजवळ १५०० विविध मनोरंजनाचे कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांसाठी सादर केले. योगासनांचे कार्यक्रमही नागरिकांच्या माहितीसाठी सादर करण्यात आले आणि कोविड कालावधीत योगाचा फायदा झाल्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियाही प्राप्त झाल्याची माहिती आयुक्तांनी या कार्यक्रमात दिली.

जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांसमोर कल्याण-डोंबिवलीतील प्रख्यात योग शिक्षक सचिन गोडांबे, श्रीकांत देव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनाचे प्रकार उपस्थित नागरिकांसमोर सादर केले. यासमयी कलर्स वाहिनीवर “सुर नवा, ध्यास नवा, आशा उदयाची “या संगीत पर्वात पारितोषिक मिळवून कल्याण डोंबिवली नगरीच्या बहुमान वाढविलेल्या प्रज्ञा साने या युवतीचा आयुक्तांच्या हस्ते सन्मानपत्र व फुलझाडाचे रोपटे देवून  सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, उप आयुक्त पल्लवी भागवत, उप आयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web