कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वाहतूक पोलिसांनी मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवला असून गेल्या तीन दिवसांपासून कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर कारवाई सुरू होती. जवळपास १०४ बुलेटवर कारवाई करून मॉडीफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले होते. त्या सायलेन्सरवर दुर्गाडी चौकात रोलर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील आदीजण उपस्थित होते.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बुलेट मोटार सायकल वाहनांचे यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल केलेल्या तसेच काळया काच लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सोमवारपासून शहर वाहतुक उपशाखा, कल्याण मार्फत कल्याण परिसरातील दुर्गाडी, सुभाष चौक, शहाडनाका, व पत्रीपुल या भागात वेगवेगळी पथके तयार करुन बुलेट मोटार सायकल वाहनांचे यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल केलेल्या एकुण ११६ वाहनांवर कारवाई करुन १०४ सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्यावर प्रचलीत मोटार वाहन कायदयानुसार कारवाई करुन एकुण १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच काळी फिल्म लावणाऱ्या एकुण ६४ वाहन चालकांवर कारवाई करुन वाहनांच्या काचेवर लावलेले काळी फिल्म काढुन घेवुन त्यांच्यावर कारवाई करुन एकुण १२ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. हि कारवाई कल्याणचे वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, मसपोनि सुनिता राजपुत, पोउपनि तुकाराम सकुंडे व पोलीस अंमलदार यांनी केलेली असुन यापुढे देखील कारवाई सुरु राहणार आहे.
बुलेट मोटार सायकलच्या यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल केल्यामुळे होणाऱ्या कर्कश आवाजामुळे वायु व ध्वनी प्रदुषण तसेच वाहने रस्त्यावरुन कर्णकर्कश आवाज करीत अनियत्रीत वेगाने चालविल्याने पादचारी, जेष्ठ नागरीक व लहान मुलाच्या आरोग्यास तसेच सुरक्षितेतेस निर्माण होणारा धोका तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होणारा नाही. याबाबत कल्याण परिसरात पी.ए सिस्टीमव्दारे नागरीकांना आव्हान करुन जनजागृती करण्यात आली आहे.