कल्याण/ प्रतिनिधी- कोरोना महामारीत नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असताना सरकारी बाबू लाच घेण्याच्या प्रमाणात काही घट करण्याच्या मानसिकतेत नाही. फुलांऐवजी भाजीपाल्याचा परवाना देण्यासाठी व्यापाऱ्याकडून १६ हजारांची लाच घेताना कल्याण कृषी उत्पन बाजार समितीचे निरीक्षक जयवंत गजानन अधिकारी याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. ही कारवाई बुधवारी संध्याकाळच्या ४.४५ च्या सुमारास करण्यात आली.यातील तक्रारदार व्यापाऱ्याचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुल विक्रीचा परवाना असलेला गाळा आहे. सदर गाळ्याचे फुलविक्री ऐवजी भाजीपाला विक्री परवाना हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला होता. सदर भाजीपाला विक्रीचा परवाना करून देण्यासाठी कल्याण एपीएमसीचे निरीक्षक जयवंत अधिकारी याने या व्यापाऱ्याकडे १६ हजार रुपयांची लाच मागितली होती. निरीक्षक अधिकारी याने केलेल्या पैशांच्या मागणीबद्दल व्यापाऱ्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला आणि लाच स्वीकारताना एपीएमसीचे निरीक्षक जयवंत अधिकारी याला ताब्यात घेतले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान कोरोना महामारीत नियमानमुळे मार्केट काही दिवसात खुले झाल्याने सरकारी बाबूने केलेल्या लाचे मागणी खरंच माणुसकीला काळिमा फासणारी आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात घटनेचा निषेध केला जात आहे .