डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्यांविरोधात आयएमएचे आंदोलन,सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून करणार काम

डोंबिवली/प्रतिनिधी – कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही डॉक्टर्स नेटाने आणि जीव तोडून आपले काम करत आहेत. असे असतानाही देशात विविध भागात रुग्णालय आणि डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले सुरूच असून या हल्ल्यांविरोधात इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे उद्या शुक्रवारी 18 जून रोजी देशभर आंदोलन केले जाणार आहे. डॉक्टरांवरील या हल्ल्यांचा प्रतिकात्मक निषेध म्हणून आणि कठोर केंद्रीय कायद्याच्या मागणीसाठी सर्व डॉक्टर्स काळ्या फिती लावून काम करणार असल्याची माहिती आयएमएच्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी दिली.

भारतात स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत ९०% आरोग्यासेवा ही खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स देत आहेत. कोवीडच्या भयानक महामारीदरम्यानही देशातील डॉक्टर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपला परिवार, जबाबदऱ्या मागे टाकून डॉक्टर्स रुग्णसेवा देत आहेत. कोरोना काळात देशभरात आपली सेवा बजावताना तब्बल 1 हजार 500 हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यानंतरही डॉक्टरांना दमदाटी करणे, अर्वाच्च भाषा वापरणे इथपासून ते जीवघेणी मारहाण करणेपर्यंत हे हल्ले सुरूच असल्याचे डॉ. पाटे यांनी सांगितले.
 
आजपर्यंत हे सर्व डॉक्टरांनी सहन केले. पण आता सहनशीलतेची मर्यादा पार झाली आहे. सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ताबोडतोब पावले उचलणे आवश्यक असून कठोर असा केंद्रीय कायदा सरकारने त्वरित आणावा. हल्लेखोर समाजकटकांवर जलद न्यायालयात सुनावणी होऊन कठोर कारवाई व्हावी. या समाजकटकांना जामीन मिळू नये अशी तरतूद असणारा कायदा केंद्राने तातडीने मंजूर करावा अशी मागणीही इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

इंडियन मेडीकल असोसीएशन गेल्या बरयाच काळापासून ही मागणी करत आहे. सरकारने आम्हाला दाद न दिल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. माणुसकी आणि जबाबदारी या दोन महत्वपूर्ण जाणीवमुळे डॉक्टर या अतिविषम परिस्थितीतही काम करत आहेत. परंतु या मानवीय आणि बलिदानात्क कामाचा मोबदला म्हणून जर अमानुष हल्ले आणि घोर अपमान असा मिळत असेल तर मात्र आम्हाला नाईलाजास्तव कठोर पावलं उचलावी लागतील असा इशाराही डॉ. मंगेश पाटे यांनी यावेळी दिला. तसेच मृत डॉक्टरांबद्दल हीन वक्त्वव्य करून अपमान करणाऱ्या रामदेव बाबांवर सरकार कारवाई का करत नाही? असा संतप्त सवालही आयएमएने उपस्थित केला आहे

यावेळी डॉ. मंगेश पाटे यांच्यासह आयएमए डोंबिवलीच्या अध्यक्ष डॉ. भक्ती लोटे, सचिव डॉ. निती उपासनी, माजी अध्यक्ष डॉ. अर्चना पाटे यांच्यासह विविध डॉक्टर उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web