कल्याण/प्रतिनिधी – ६ फुटी अजगराला वॉर रेस्क्यू फाउंडेशनने जीवनदान दिल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.गेल्या ४८ तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व ठिकाणी पाणी भरले होते. बिळात पाणी शिरल्यामुळे सगळे सरपटणारे जीव मानवी वस्तीत शिरले. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी राहणारे श्री. म्हात्रे ह्यांच्या अंगणात ६ फुटी भारतीय अजगर आढळून आला. तेव्हा त्यांनी वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या हेल्पलाइन वर कॉल केला.
यावेळी सर्पमित्र कुलदीप चिकनकर, राज गायकर, मुंबई पोलीस मुरलीधर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व अजगराला सुरक्षित पकडून कल्याण वनविभागाच्या स्वाधीन केले. त्या वेळेस वनपाल मच्छिंद्र जाधव व वन रक्षक रोहित भोई उपस्थित होते. लवकरच त्याला निसर्ग मुक्त करण्यात येईल असे वनपाल मच्छिंद्र जाधव यांनी सांगितले.