कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत कल्याणमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेत्तृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी किल्ला चौकापर्यंत मानवी साखळी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मानवी साखळीला सुरवात करण्यात आली. नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे नेते, माजी खासदार दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. महाराष्ट्र सरकार याबाबत कुठेही सकारात्मक विचार करत आहे असे दिसून येत नाही.
दि. बा. पाटील हे शेतकरी, वंचित, गोर गरीब, भूमिपुत्र, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढले. त्यासाठी आज पूर्ण बहुजन समाज रस्त्यावर उतरला आहे. आगरी कोळी समाजाची जी मागणी आहे त्या मागणीला बहुजन समाज आणि भटके विमुक्त समाजाने देखील पाठींबा दिला आहे. खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कोणतेही राजकारण व्हायला नको होते, कोणताही विरोध व्हायला नको होता. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडीचे सरकार असून त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये राजकारण केले असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.दरम्यान या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, संजय कारभारी, रवी गायकर, अर्जुन म्हात्रे, उल्हास भोईर, गणेश चौधरी, विनोद केणे, दिपक दोरलेकर, राहुल भोईर, शुभा पाध्ये, रेखा तरे, प्रिया शर्मा आदी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.