मोहळ तालुक्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्क यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

सोलापूर/अशोक कांबळे – मोहोळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना तालुका समूह संघटक मंजुश्री जाधव अपमानास्पद वागणूक व त्रास देत आहेत.याची तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने मोहोळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.समूह संघटक मंजुश्री जाधव या नाहक त्रास देत असून त्यांची बदली केल्याशिवाय काम सुरु करणार नसल्याचा पवित्रा मोहोळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी घेतला आहे.

मोहोळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना तालुका समूह संघटक मंजुश्री जाधव यांच्याकडून वेळोवेळी अपमानास्पद वागणूक व त्रास होत असल्याची तक्रार घेऊन मोहोळ तालुक्यातील गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या मारला.तालुक्यातील समूह संघटक जाधव यांच्याकडून आशा सेविकांचे मोबदला कपात करणे, राज्य शासनाकडून प्राप्त वाढीव मोबदल्यात कपात करणे, गटप्रवर्तक यांच्या मानधनात कपात करण्याची धमकी देणे, गटप्रवर्तक यांना सकाळी ऑफिसात रिपोर्टिंगला बोलावून संध्याकाळपर्यंत विनाकारण ऑफिस बाहेर बसवून ठेवणे, एकाही गट प्रवर्तकाच्या कार्यक्षेत्रात भेटी न देता केवळ ऑफिसमध्ये बसूनच फोनवरून रिपोर्टिंग घेणे, पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी इतरांसमोर गटप्रवर्तक यांना अपमानित करणे, शासनाकडून येणारी कोणतीही माहिती तसेच परिपत्रक न देणे, गटप्रवर्तक कामासाठी आलेली स्टेशनरी त्यांना ताब्यात न देणे, अशा स्वरुपाची अडवणूक तालुका समूह संघटनांकडून होत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी केला. तसेच जोपर्यंत तालुका समूह संघटक यांची बदली होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने मोहोळ तालुक्यातील कोरोना लसीकरण,घरोघरची तपासणी,सर्वेक्षण, अक्सिजन पातळी तपासणी,कोरोना तापमान तपासणी या कामावर परिणाम झाला असून मोहोळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या आंदोलनात लाल बावटा युनियनच्या सचिवा पुष्पा पाटील, गटप्रवर्तक ज्योती घोडके, महानंदा कुंभार, सुजाता माशाळ, वृषाली थिटे, स्वप्नाली म्हमाणे, शीतल सावंत, ज्योती शिंदे, स्वाती वाघमारे, रोहिणी हराळे, भारती तांदळे आदीसह आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या आहेत.

लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या सचिव पुष्पा पाटील यांनी सांगितले की,मोहोळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मंजुश्री जाधव त्रास देत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करूनही केवळ पोकळ आश्वासन मिळाले.त्यामुळे आमची निराशा झाली असून जोपर्यंत मंजुश्री जाधव यांची बदली होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहे. गटविकास अधिकारी यांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय नेमली आहे ती आम्हाला मान्य नाही.या समितीत आशा वर्कर्स व गटप्रवर्तक याचा सामवेश नाही.त्यामुळे शासन केवळ चौकसीचा फार्स आवळत आहे.

बेमुदत आंदोलनाला बसलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी पत्राद्वारे कळविले आहे की,तालुक्यातील समूह संघटक आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना अपमानास्पद वागणूक व त्रास देत असल्याच्या कारणाने लाल बावटा संघटनेने सुरु केलेल्या काम बंद आंदोलनाची दखल घेतली असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web