कल्याण/प्रतिनिधी – एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या ५ आरोपींना शिताफीने अटक करुन अपहरण केलेले बाळ ४८ तासांच्या आत परत मिळविण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पो.स्टे. हद्दीत फिर्यादी सुनिता राजकुमार नाथ वय ३० वर्षे राहणार कल्याण मुळ रा. हाजीपुर, पटना, बिहार राज्य ह्या ५ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महंमद अली चौक, शिवमंदिराच्या बाजुस एका दुकानाच्या बाहेर त्याच्या ६ महिन्यांच्या मुलांसह झोपल्या असतांना रात्री १० ते १ च्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुनिता यांच्याजवळ झोपलेले त्यांचे ६ महिन्यांचे लहान बाळ जिवा याचे अपहरण केले होते. याबाबत ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे सपोनि सरोदे, सपोनि पाटील व स्टाफ यांनी घटनास्थळ परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजच्या मदतीने तांत्रीक तपास करुन या गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. त्याप्रमाणे आरोपींचा कसोशिने व चिकाटीने शोध घेवुन आरोपी विशाल चंद्रकांत त्र्यंबके वय २० वर्षे आटाळी आंबिवली, कुणाल विष्णु कोट वय २३ वर्षे रा.साई राणा चाळ,दिवा पुर्व, आरती कुणाल कोट वय २२ वर्षे, हिना फरहान माजीद वय २६ वर्षे रा. कोटर मशिद जवळ, भिवंडी, फरहान अब्दुल रझाक माजीद वय ३८ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन अपहरण केलेले ६ महिन्याचे बाळ ४८ तासाच्या आत सुखरुपपणे परत मिळविले आहे.
आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट हे काही कामधंदा करीत नाहीत. आरोपींनी आपसात संगनमत करुन आरोपी हिना माजीद आणि फरहान माजीद यांना लहान बाळ एक लाख रुपयांना विकण्यासाठी आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट यांनी फिर्यादी जवळ झोपलेले लहान बाळ अलगद उचलुन त्याचे अपहरण करुन ते आरोपी आरती कोट हिच्या ताब्यात दिले. आरतीने हे बाळ आरोपी हिना माजीद व फरहान माजीद यांच्या ताब्यात देवुन ते तिघेही रिक्षातुन बाळाला घेवुन जात असतांना त्यांना शिताफीने अटक करुन त्यांच्या ताब्यातुन बाळ सुखरुपपणे परत मिळविले आहे.
आरोपी हिना व फरहान माजीद हे गुन्हयात निष्पन्न झालेल्या पाहीजे असलेल्या आरोपी महीलेला हे बाळ विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले असून या पाहीजे असलेल्या महिलेचा शोध सुरु आहे. तर या पाचही आरोपींना अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ जून पर्यंत पोलीस कोठडीमध्य रवानगी केली आहे.
सदरची कारवाई महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि दिपक सरोदे, प्रकाश पाटील, पोउनि संजय जगताप, सपोउनि जे.के.शिंदे, पोहवा निकाळे, भालेराव,पोना ठिकेकर, भालेराव, भोईर, हासे, मधाळे, पोशि जाधव, निसार पिंजारी यांनी केली असून या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ढोले हे करीत आहेत.