भिवंडीत श्रमजीवी कार्यकर्त्यांनी पकडून दिला काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे नऊ टन रेशनिंगचे धान्य

भिवंडी/प्रतिनिधी – पडघा परिसरातील रेशनिंग दुकानांवर गरीब लाभार्थ्यांना पुरवण्यात येणारा गहू ,तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेंपो श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पडघा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी पडघा येथील वजन काट्यासमोर घडली आहे. पडघा परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार आदिवासी ,गोरगरीब लाभार्त्यांना धान्य न देता दुकानातील गहू ,तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करतात अशी माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली असता श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल लोणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई – नाशिक महामार्गावरील वजन काट्यावर सापळा लावला असता एक आयशर टेंपो क्र. एमएच – एएम – १८६६ हा धान्याने भरलेल्या प्लास्टिकच्या गोणी वजन करण्यासाठी आला असता टेंपो चालकाला तपासणीसाठी थांबवून त्याच्याकडे गहू , तांदळाच्या खरेदी पावत्या मागितल्या मात्र चालक छोटू यादव याने बोगस पावत्या दाखवून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता वेगवेगळ्या कंपनीच्या छपाई असलेल्या गोणी आढळून आल्याने गोणींमध्ये रेशनिंगचा गहू ,तांदूळ असल्याचा संशय बळावल्याने श्रमजीवी कार्यकर्त्यांनी तहसीलदार अधिक पाटील व पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी तालुका पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे व पडघा पोलिसांचे पथक तात्काळ पोहचले व त्यांनी त्वरित पंचनामा सुरू केला असता टेंपोत ५० किलो वजनाच्या गव्हाच्या १०० गोणी तर तांदळाच्या ६० गोणी आशा एकूण सुमारे ९ टन वजनाच्या २ लाख ७० हजार रुपये किंमतीचे गहू ,तांदूळ टेंपोत आढळून आले.  

हे गहू ,तांदूळ पडघा येथील धान्य व्यापारी सचिन बिडवी यांच्या गोदामातून भरल्याची कबुली चालक छोटू यादव याने दिली आहे. तर घटनास्थळाचा पंचनामा सुरु असताना रेशनिंग दुकानदार अशोक पाटील रा.आमणे व अशोक भोईर रा.धामणगांव हे दोघे घटनास्थळी येऊन धान्य व्यापारी सचिन बिडवी यांना एकवेळ माफ करा अशी विनवणी करू लागले त्यामुळे या काळ्या बाजारातील धान्य विक्रीत या दोघा रेशनिंग दुकानदारांचा सहभाग असावा असा संशय श्रमजीवीचे तालुकाध्यक्ष सुनिल लोणे यांनी पंचनाम्यात व्यक्त केला आहे. सदरचे धान्य व टेंपो पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे यांनी पडघा पोलिसांच्या ताब्यात दिले असून टेंपो मालक बाळू शेठ रा.कल्याण व चालक छोटू यादव रा.उत्तर प्रदेश यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला असून राशन दुकानदारांना पडघा पोलोसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती पडघा पोलोसांनी दिली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web