रोटरॅक्ट क्लब ऑफ़ डोंबिवलीने दहिवली माध्यमिक शाळेला दिला मदतीचा हात

मुरबाड/प्रतिनिधी – आपला समाज आपल्याला घडवतो, वाढवतो, आपल्याला चांगले संस्कार शिकवतो आणि म्हणूनच आपण आपल्या समाजाचं देणं लागतो. हेच ध्येय साध्य करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ़ डोंबिवली मार्फत मागिल ४९ वर्षांपासुन समाजकल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या क्लब ची ओळख मानला जाणारा व तब्बल १९ वर्षे परंपरागत राबविला जाणारा उपक्रम म्हणजे श्रीकांत. सध्याच्या कोरोनाच्या परीस्थितित संपूर्ण काळजी घेत या युवा तरुणायीने दिनांक २७ व २८ मे रोजी, दहिवली, जिल्हा मुरबाड या खेडेगावात हा उपक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला.गेल्या १९ वर्षात श्रीकांत अंतर्गत रोटरॅक्ट क्लब ऑफ़ डोंबिवलीने अनेक शाळांचे दुरुस्तीकरण, रंगकाम, आवश्यक वस्तुंचे वाटप केलेत तर काही गावांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या ही वर्षी या क्लब ने दहिवली माध्यमिक शाळेस सुमारेस रु ७०,०००/- ची मदत केली. वय वर्ष १६ ते ३० असा तरुण वर्गाचा समावेश असलेल्या या क्लब ने वाढत्या कोरोनाच्या संकटकाळी सुद्धा २० दिवसातच जवळपास रु. ७०,०००/- ची देणगी जमा केली.

क्लब तर्फे या शाळेस २ सोलार स्ट्रीट लाईट भेट देण्यात आले ज्यामुळे आतापासून ही शाळा अधिकृतरित्या “ग्रीन स्कूल” म्हणून ओळखली जाईल. त्याच बरोबर, शाळेला नवा रंग देखील लावला गेला. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थीनींना त्यांच्या मासिक पाळीच्या वेळिस शाळेत व शिक्षणात काही त्रास होऊ नये म्हणून क्लब ने सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन व ५०० सॅनिटरी नॅपकिन शाळेस भेट दिले व त्या सोबत त्याच्या विल्हेवाटाची सोय ही करुन देण्यात आली.
शाळेच्या ग्रंथालयासाठी एक कपाट, १५० पुस्तके, ३०० स्टेशनरी कीट, विद्यार्थी व शिक्षकांसाठी भूमिती चे साहित्य, मुलांच्या खेळाचे साहित्य व इतर वस्तुही भेट देण्यात आल्या. क्लबचे अध्यक्ष रो. अजिंक्य धुरी यांनी या वर्षापासुन गरजू व हुशार मुलांसाठी “श्रीकांत शिष्यवृत्ती” ची सुरुवात केली व या शाळेतल्या ३ विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

सध्याची परिस्थिती पाहता क्लबच्या अध्यक्षांसोबत, क्लब चे उपाध्यक्ष रो. मिहीर कोचरेकर, सचिव रो. अनिकेत शीरकर, माजी अध्यक्ष रो. अमित लाड, रो. स्वप्निल कडू, रो. संजीव तांबे, रो. निकेन जोबनपत्रा, व काही मोजक्याच सदस्यांनी या शाळेस भेट दिली. समोर कितीही मोठे संकट असुदे, रोटरॅक्ट क्लब ऑफ़ डोंबिवलीच्या या युवांनी त्यांची शान असलेला “श्रीकांत २०२१” हा समाजोपयोगी उपक्रम अतिशय उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पाडला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web