डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. पेंढारकर रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपाबाहेर करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती अक्षरशः गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने तर रेकॉर्डब्रेक प्रति लिटर 100 रुपयांचा टप्पा पार करत महागाईच्या आगीत फोडणी टाकली आहे. या महागाईचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आंदोलन केल्याची माहिती शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली. मोदी सरकारने सत्तेवर येताना अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते, पण प्रत्यक्षात देशामध्ये मात्र महागाईने कहर केला आहे. हे मोदी सरकार नसून महागाई सरकार असल्याची टिकाही राजेश मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.दरम्यान यावेळी शिवसेनेतर्फे “हर हर महंगाई, घर घर महंगाई”, मोदी सरकार हाय हाय अशा अनेक जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध म्हणून घरगुती गॅस सिलेंडरही आणण्यात आला होता.यावेळी राजेश कदम, दिपक भोसले, संजय पावशे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी- कार्यकर्तेही सहभागी झाले होते.