अतर्गत मूल्यमापनातून दहावीचे सरसकट विद्यार्थी होणार उत्तीर्ण,अकरावीसाठी प्रवेश परीक्षा

मुंबई/प्रतिनिधी – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.१० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

प्रा. गायकवाड पुढे म्हणाल्या, कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना विभागातील तज्‍ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा केली आहे.सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने आली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अध्यापनासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव मार्च २०२१ पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित इ. १० वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने इ. ९ वी व इ. १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०-२१ साठी इ. १० वी परीक्षेच्या अंतिम निकालाचे निकष.

  • विद्यार्थ्यांचे इ. १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
  • विद्यार्थ्यांचे इ. १० वीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
  • विद्यार्थ्यांचा इ. ९ वीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इ. ९ वी संपादणूक यासाठी ५० % भारांश व इ. १० वी संपादणूक यासाठी ५० % भारांश)

हे मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इ. १० वीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (इ. ९ वीचा) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे.

ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-१९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ठ होण्याची संधी उपलब्ध असेल.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.

शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

जून अखेर लागेल निकाल

मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रा.गायकवाड यांनी केले आहे.

पुनर्परीक्षा आणि श्रेणी सुधार

पुनर्परीक्षार्थी (Repeater Student), खाजगी (Form no. १७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजने (Class Improvement) अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील. राज्यातील इ. १० वी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार आम्ही धोरण तयार करताना केला आहे.

अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा

विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इ. १० वीच्या निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इ. ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेणार आहोत. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.१० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.

इ. ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वी च्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असेही शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web