कल्याणचे आधारवाडी डंम्पिग ग्राऊंड अखेर कचऱ्या पासून मुक्त

कल्याण/प्रतिनिधी – गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद होण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेरीस हि प्रतीक्षा संपली असून आज पासून या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे.  

२५ मे २०२० रोजी शून्य कचरा मोहीम राबविण्यास प्रारंभ झाल्यापासून वर्षपूर्ती नंतर आता आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. गेल्यावर्षी २०२० मध्ये कोविड साथ ऐनभरात असताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी त्यांचे विभागामार्फत शून्य कचरा मोहीम २५ मे  २०२० पासून राबविण्यात सुरुवात केली. कोविड कालावधीत हि मोहीम राबवताना सुरुवातीला नागरिकांकडून, लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला, परंतु उपायुक्त कोकरे यांनी त्यांच्या घनकचरा विभागातील पथकामार्फत याबाबत जनजागृती करण्यासाठी २०० कार्यशाळा, ५० व्हिडिओ कॉन्फरन्स आणि १० वेळा फेसबुक वर लाईव्ह जाऊन नागरिकांशी संवाद साधला.

त्याच प्रमाणे घनकचरा विभागामार्फत गृहनिर्माण सोसायटी मध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन, तेथे मिटिंग्स आयोजित करून त्यांना कचरा वर्गीकरण करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. तसेच महानगरपालिकाकडे असलेली कचरा संकलनाची वाहने व कर्मचारी यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात येऊन आठवड्यातील रविवार, बुधवार या दोन दिवशी फक्त सुका कचरा उचलण्याची पद्धत अवलंबण्यात आली आणि ओला कचरा आणि सॅनेटरी नॅपकिन हे दररोज उचलण्यात येऊ लागल्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण करणे सुलभ झाले.

प्लास्टिक हे पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक असल्यामुळे स्वच्छता मार्शल यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. त्याच प्रमाणे दर रविवारी प्लास्टिक संकलन केंद्रामार्फत प्लास्टिक संकलनाची व्यवस्था करण्यात आली आणि प्रत्येक महिन्याच्या पहिला रविवारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दुसरा रविवारी कापड, गाद्या, जुने कपडे, तिसरा रविवारी काच व कागद, चौथा रविवारी चप्पल बूट फर्निचर इत्यादी वस्तूंच्या संकलनासाठी संकलन केंद्र तयार करण्यात आले. ५ किलो प्लास्टिक च्या बदल्यात एक वेळेची पोळी-भाजीची अभिनव संकल्पनादेखील महापालिकेमार्फत सुरु करण्यात आली. या सर्व बाबींमुळे प्लास्टिकवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश मिळाले आहे.

शहर अभियंता सपना देवनपल्ली (कोळी) व कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्या विशेष प्रयत्नांतून महापालिकेमार्फत उंबर्डे येथे ३५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यात आला असून बारावे येथे २०० मेट्रिक टन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. तसेच बारावे येथे प्लास्टिक पासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प ही सीएसआर फंडातून तयार करण्याबाबत आला आहे. त्याचप्रमाणे बारावे येथे सुरू असलेल्या २५ मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पापासून सीएनजी गॅस तयार करण्याच्या प्रकल्पालाही चालना देण्यात आली आहे तसेच आयरे, उंबर्डे, कचोरे व बारावे येथे १० टन क्षमतेने बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत.

 महापालिका क्षेत्रात काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांचा कचरा त्यांच्या आवारात जिरवून त्याच्यापासून खत निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. अशा संस्थांना मालमत्ता करांमध्ये ५ % सूट देण्यात येत आहे. संस्थानी सध्या महापालिका क्षेत्रात जवळ जवळ ८०-९० % कचऱ्याचे वर्गीकरण होत असून सुका कचरा, कचरा संकलन केंद्राकडे पाठवण्यात येत असून त्यामधील सुका कचरा रिसायकलिंग अंती वापरण्यात येत आहे. उंबर्डे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामधून आज पर्यंत ३००० मेट्रिक टन इतक्या खताची निर्मिती करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात सुका कचरा संकलन करण्या-या संस्था सध्या कार्यरत असून त्यांचेकडून सुका कचरा उचलण्याच्या मोबदल्यात आता पर्यंत रु.३ लाख इतकी रॉयल्टी महापालिकेस प्राप्त झाले असून अशा प्रकारे कच-या पासून रॉयल्टी मिळणारी महाराष्ट्रातील ही एकमेव महापालिका आहे. सन्मा.

खासदार, आमदार, महापालिकेचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, स्वच्छ डोंबिवली मंच व इतर विविध सामाजिक संस्था, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिकेचे नागरिक यांचे मधील सुसंवादाने आणि समन्वयाने हे शक्य झाले असल्याची महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web