महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे चक्रीवादळामुळे तीन कोटींचे नुकसान

कल्याण/प्रतिनिधी – तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणच्या कल्याण परिमंडलातील वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार वीज वितरण यंत्रणेचे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर वादळामुळे वीजपुरवठा बाधित झालेल्या १३ लाख ३० हजारपैकी ११ लाख ३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी सकाळपर्यंत सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी, अभियंते, कंत्राटदारांचे कामगार अथकपणे मेहनत घेत आहेत.

चक्रीवादळामुळे ५४ उपकेंद्र, ४०५ वीजवाहिन्या, ७ हजार ३४३ वितरण रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी ११३३ गावांचा व सर्व वर्गवारीतील १३ लाख २९ हजार ९१४ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. उच्चदाब वाहिन्यांचे २३४ तर लघुदाब वाहिन्यांचे ३०२ विजेचे खांब कोसळले किंवा वाकले. वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसात कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले.

विपरीत परिस्थितीत अव्याहतपणे काम करून ४५ उपकेंद्र, ३१३ वीजवाहिन्या, ४ हजार ३९७ वितरण रोहित्र दुरुस्त करून ११ लाख २ हजार ७५१ ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी सकाळपर्यंत पूर्ववत करण्यात आला. उच्चदाब वाहिनीचे ६२ व लघुदाब वाहिनीचे ८६ वीजखांब नव्याने उभारण्यात आले. वीजवाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडणे, झाडाच्या फांद्या पडणे, लोखंडी पत्रे, फ्लेक्स व त्यासाठीचा सांगाडा पडणे यातून मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत.

कल्याण परिमंडलातील कल्याण मंडल एक अंतर्गत बाधित झालेल्या सर्वच ४ लाख ७५ हजार २५१ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. कल्याण मंडल दोन अंतर्गत २ लाख ६५ हजार ७२९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी २ लाख ५८ हजार १९८ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. वसई मंडळातील वसई व विरार विभागात २ लाख ३९ हजार ५४१ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. त्यातील २ लाख १३ हजार ६८२ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

 सर्वाधिक फटका बसलेल्या पालघर मंडलात ३ लाख ४९ हजार ३९३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील २ लाख १३ हजार ६८२ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी अव्याहतपणे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या नैसर्गिक संकटात सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून वीज ग्राहकांना करण्यात आले आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web