चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान

मुंबई /प्रतिनिधी – संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य सत्संग भवनामध्ये शुक्रवारी  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.हे लसीकरण केंद्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण योजनेनुसार नियमितपणे कार्यान्वित राहणार आहे. लसीकरण केंद्रासाठी निरंकारी भवनाची जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल बीएमसीच्या स्थानीय प्रशासनाकडून मंडळाला धन्यवाद दिले असून स्थानिक नागरिकांकडून याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासूनच संत निरंकारी मिशन देशभर अनेक पद्धतीने आपल्या सेवा प्रदान करत आले आहे. अलिकडेच दिल्लीमध्ये निरंकारी भवनामध्ये १००० बेडचे हॉस्पिटल पायाभूत सुविधांसह कोविड हेल्थ सेंटरच्या रूपात दिल्ली प्रशासनाला उपलब्ध करुन दिले गेले आहे तर हरियाणातील काही भवनांचेही कोविड उपचार केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. 

      महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील नानगांव, ता.दौंड येथील निरंकारी भवन कोविड हेल्थ सेंटर मध्ये रुपांतरित करण्यात आले आहे तर रायगड आणि सातारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाचे डबे देण्याची सेवा करण्यात येत आहे. संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, दादर येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८१ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढीकडून करण्यात आले. संत निरंकारी मंडळाचे स्थानिक प्रबंधक, सेवादल युनिट नं.२०७ आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.  शिबिरामध्ये कोविड-१९ संदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web