खा.राजीव सातव यांच्या निधनाने युवा नेतृत्वास देश मुकला – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई/प्रतिनिधी – आपल्या कार्याने युवकांसाठी आदर्श ठरलेल्या खासदार राजीव सातव यांचा निधनाने युवा नेतृत्वास देश मुकला आहे, अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोक संदेशात प्रा.गायकवाड म्हणतात, खासदार राजीव सातव यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात मराठवाडा येथून केली. हिंगोली मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समिती सदस्य, जिल्हापरिषद सदस्य, म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००९ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. सन २०१४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते.  सन २००८-२०१० या कालावधीत महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्यांना पक्षाने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २०१० ते २०१४ या कालावधीत काम करण्याची संधी दिली. गुजरात निवडणुकीतही भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती.

खासदार राजीव सातव यांचे सर्व पक्षातील लोकांशी मित्रत्वाचे संबंध होते. दूरदृष्टी असलेले एक अजातशत्रू , सात्विक , सोज्वळ  व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. एका कर्तृत्ववान युवा नेत्याच्या अकाली निधनाने भारतीय राजकारणाची व सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web