सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ आज सकाळी जिल्ह्याच्या समुद्रात दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वारे व पाऊस झाला. दुपारी हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रातून रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकले. रात्रीपासूनच जिल्ह्यात जोरदार पावसास सुरुवात झाली. तसेच जिल्ह्यात सुमारे 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. याकाळात जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सर्व खबरदारीमुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जिल्ह्या आज दुपारपर्यंत एकूण 94 पूर्णाक 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावासाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 05, सावंतवाडी – 15, वेंगुर्ला – 23, कुडाळ 6.5, मालवण – 12, कणकवली – 13, देवगड – 15, वैभववाडी – 05 असा एकूण 94 पूर्णांक 5 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सरासरी 11.81 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. फोंडा तसेच करूळ घाटातही झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरच्या एकूण 137 कुटुंबाचे स्थलांतरण करण्यात आले.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क होते. या संपूर्ण काळामध्ये जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर येथील विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात आली. विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच कोविड रुग्णालयांमध्येही कोणताही अनुचित प्रकार या काळात घडला नाही. सर्व कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता. रत्नागिरी आणि कोल्हापूर येथून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा ही या संपूर्णकाळामध्ये सुरळीत ठेवण्यात आला. या वादळाच्या काळातही रत्नागिरी आणि कोल्हापूर येथून जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडर दाखल झाली आहेत. महत्वाच्या मार्गांवर झाडे पडण्याचा प्रकार घडला होता. पण, सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी, वडकटर यासह तैनात केलेले पथक व स्थानिक प्रशासन यांनी तात्काळ कार्यवाही करत अवघ्या 15 ते 20 मिनीटांमध्ये रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील अशी व्यवस्था केली. त्यामुळे ऑक्सिजनच्या वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही. तसेच नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे जीवित हानी झालेली नाही.

वादळ रत्नागिरीकडे सरकले असले तरी जिल्ह्यातील धोका अजून टळलेला नाही. जोरदार पाऊस व वेगवान वारे सुरूच आहेत. तसेच सीसीसी आणि कोविड रुग्णालय येथे जनरेटर कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. तहसिलदार यांनी अतिरिक्त डिझेलचा साठा करून ठेवावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या आहेत. जणे करून गरज भासल्यास डिजेलच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. इतर ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. विद्युत वितरण विभागाचेही या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सद्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार उद्या दिनांक 17 मे 2021 रोजी ताशी 70 ते 80 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तर मालवण ते वसई या समुद्र किनाऱ्यावर 3.3 मीटर ते 6.2 मीटर उंचीच्या लाटा उद्या दि. 17 मे 2021 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत उसळणार आहेत. तसेच वेंगुर्ला ते वास्को या किनारपट्टीवर लाटांची उंची 3.2 मीटर ते 6.0 मीटर इतकी असणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी तसेच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्राच्या जवळ लाटा पाहण्यासाठी उभे राहु नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web